पुणे : पावसाचे कारण देत खोलीमध्ये डाराडूर झोपलेल्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतच राहिला. संताप आणणारी ही घटना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये घडली. बुधवारी सकाळी सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नातेवाईकांना ही गोष्ट निदर्शनास आल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. याप्रकरणी प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. नितीन शंकर चव्हाण (रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर) या तरुणाचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी अडीचच्या दरम्यान अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधी लागणारे लाकूड तसेच अन्य साहित्य, पुरेसे रॉकेलही नातेवाईकांनी येथील कर्मचाऱ्यांकडे सोपविले होते. पुरेशी लाकडे देऊनही मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत कसा राहिला असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित करीत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. परंतू, कर्मचारी व सुपरवायझर यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. पालिकेने वैकुंठ स्मशानभूमीमध्ये प्रदुषणमुक्त अंत्यविधीकरिता धूर शोषून घेणाऱ्या चिमण्या बसविल्या आहेत. त्याचा ठेका मुंबईच्या ‘निकीता बॉयलर’ या ठेकेदाराला देण्यात आले आहे. वैकुंठामध्ये ठेकेदाराने एकूण 13 जणांना (ऑपरेटर) तीन पाळ्यांमध्ये कामाची जबाबदारी दिलेली आहे. सकाळी सहा, दुपारी चार तर रात्रीच्यावेळी तीन जणांची ड्युटी लावली जाते. मंगळवारी दुपारी नितीन चव्हाण यांच्यावर अंत्यविधी झाला. रात्री दहा वाजता शिफ्ट संपल्याने दुपारच्या ऑपरेटरने रात्रीच्या ऑपरेटरकडे कामाची सूत्रे दिली. रात्रीच्या ऑपरेटरने मृतदेहाच्या पाय आणि डोक्याजवळील लाकडे काढून ती होळीला रचतात त्याप्रमाणे मृतदेहाच्या शिल्लक राहिलेल्या भागाभोवती रचली. मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस पडत असल्याने शेडमध्ये थांबणे अवघड झाल्याने हा ऑपरेटर खोलीमध्ये जाऊन बसला. दरम्यान, रात्री अन्य शेडमध्ये अंत्यविधी झालेल्या मृतदेहांच्या बाबतही थोड्या फार प्रमाणात असाच प्रकार घडला. खोलीमध्ये जाऊन बसलेला हा कर्मचारी थेट सकाळीच बाहेर आला. सावडण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नातेवाईकांना अर्धवट जळालेले मृतदेहाचे गोळे दिसल्याने संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचारी तसेच ठेकेदाराच्या सुपरवायझरकडे संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी जळालेल्या भागाच्या अस्थी घेऊन सावडण्याचा कार्यक्रम कसाबसा पार पाडला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जास्तीची लाकडे लावून उरलेला मृतदेहाचा भाग जाळण्याची व्यवस्था केली.========वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकूण चार शेड असून त्यामध्ये चार ते पाच मृतदेह जाळण्याची व्यवस्था आहे. ठेकेदाराकडून प्रत्येक शेडसाठी तीन शिफ्टमध्ये कामगार नेमण्यात आलेले आहेत. मृतदेहावर अंत्यविधी झाल्यानंतर हा मृतदेह व्यवस्थित जळतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांची आहे. लाकडे कमी पडत असतील अथवा अन्य काही अडचण असल्यास नातेवाईकांना फोन करुन माहिती देणे या कामगारांना बंधनकारक आहे. तसेच सावडण्याचा कार्यक्रम झाल्यावर रक्षा उचलणे, स्वच्छता करणे ही सुद्धा त्यांचीच जबाबदारी आहे. परंतू, ऑपरेटरने चव्हाण यांच्या मृतदेहाबाबत कोणतीही माहिती नातेवाईकांना कळविली नाही. ====हा एकंदर प्रकार चिड आणणारा आणि असंवेदनशील आहे. माझ्या भावाच्या मृतदेहाबाबत हा प्रकार घडला. परंतू, दुर्लक्ष केल्यास आणखी कोणासोबतही हा प्रकार घडू शकतो. ठेकेदार, कामगार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणासोबतच अमानवी भावनांना कोण आवर घालणार असा प्रश्न आहे. दोषींवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. - सतीश चव्हाण, पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर====दुपारच्या ऑपरेटरनेही मृतदेह व्यवस्थित जळतो आहे की नाही हे पाहिले होते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, दुपारी अडीचच्या सुमारास अंत्यविधी झाल्यानंतर रात्री दहापर्यंत मृतदेह पूर्णपणे जळणे अपेक्षित होते. परंतू, दुसऱ्यादिवशी सकाळपर्यंत अग्नी राहूनही मृतदेह अर्धवटच जळालेल्या अवस्थेत कसा राहिला असा प्रश्न आहे.
मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सोडून कर्मचारी ढाराढूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 3:16 PM
वैकुंठ स्मशानभूमीतील प्रकार : राख सावडायला गेलेल्या नातेवाईकाना संताप अनावर..
ठळक मुद्देकामगार आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणासोबतच अमानवी भावनांना कोण आवर घालणार वैकुंठामध्ये ठेकेदाराने एकूण 13 जणांना (ऑपरेटर) तीन पाळ्यांमध्ये कामाची जबाबदारी दिलेलीअन्य शेडमध्ये अंत्यविधी झालेल्या मृतदेहांच्या बाबतही थोड्या फार प्रमाणात असाच प्रकार