पुणे : मेट्रो प्रकल्पासाठी शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळा वासाहतीसह राजीव गांधी नगरमधील नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. हडपसर आणि विमाननगर येथील एसआरए प्रकल्पामध्ये या नागरिकांना सदनिका देण्यात आल्या आहेत. नवीन सदनिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली जाणार आहे. येत्या ४ ते ८ जून दरम्यान (शनिवार व रविवारदेखील) करण्यात येणार असल्याचे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.
झोपडीधारकांची पुनर्वसन प्रक्रिया २४ मेपासून सुरू करण्यात आली आहे. या वसाहतींच्या जागेवर मेट्रोचे मुख्य स्थानक उभारण्यात येणार आहे. बाधित नागरिकांना देण्यात आलेल्या सदनिकांच्या नोंदणीचे काम दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. २८ मेपर्यंत १५५ सदनिकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित सदनिकाधारकांच्या नोंदणीचे काम ४ जून ते ८ जून दरम्यान करण्यात येणार आहे.
या कालावधीत शनिवार व रविवारची शासकिय सुट्टी आहे. तरीदेखी सह दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जिल्हाधिकारी कार्यालय, एरंडवणे आणि दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली जाणार आहे. प्रत्येक सदनिकाधारकांना टोकन देण्यात येणार असून वेळापत्रकानुसार पात्र झोपडीधारक, त्याच्यासोबत सह हक्कदार/ वारस अशा केवळ दोन व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. येताना आधार कार्ड व सूचनापत्र आणणे बंधनकारक राहाणार आहे.
----
पुनर्वसन झालेल्या झोपडीधारकाने त्याची सध्याची झोपडी रिकामी करून सर्व घरगुती साहित्य ७ जून ते १० जूनदरम्यान घेऊन जावे. यासाठी येणाऱ्या खर्चाचे ४ हजार रुपये झोपडीधारकाला देण्यात येणार आहेत.
----
दुय्यम निबंधक कार्यालयातील सदनिका नोंदणीच्या दिवशी उपस्थित न राहणारे, तसेच नवीन सदनिकेचा ताबा न घेणारे झोपडीधारक सदनिका स्वीकारण्यास इच्छुक नाहीत असे समजून सदनिका रद्द करण्यात येईल. यासोबतच झोपडी निष्कासनाची कारवाई देखील करण्यात येणार आहे.
- राजेंद्र निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण