कार्यकर्त्यांनो.. मतमोजणीवेळी सतर्क राहा : काँग्रेसचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 06:41 PM2019-05-22T18:41:57+5:302019-05-22T18:43:00+5:30
एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचे आहे...
पुणे : मतमोजणीसाठी निश्चित केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी सकाळी बैठक घेतली व त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका, प्रत्येक मत आपल्यासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे मतमोजणीवर बारकाईने लक्षा ठेवा, असे या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. काँग्रेसने मतदानाच्या वेळीच प्रत्येक केंद्रावरील मतदान यंत्रांचे क्रमांक लिहून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांना दिले आहे. मतमोजणीची रचना आहे त्याप्रमाणेच कार्यकर्त्यांचीही रचना केली आहे. त्यामुळे तुमच्याजवळीक मतदान यंत्रांचा क्रमांक व समोर कर्मचाऱ्यांनी मतमोजणीसाठी आणलेले यंत्र याचे क्रमांक तपासून पाहा, यंत्रांचे सील तोडताना आधी ते बरोबर आहे हे तपासून घ्या अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.
बागवे म्हणाले, उमेदवार मोहन जोशी व मी असे दोघेही मतमोजणी सभागृहात सकाळीच उपस्थित असणार आहोत. मतदानयंत्रात काही फेरफार दिसले की त्याची लगेचच तक्रार करणार आहे. पारदर्शक पद्धतीने मतमोजणी व्हावी असेच आमचे म्हणणे आहे. प्रशासनानेही आम्हाला किंवा आमच्या विरोधकांना, कोणाचीही बाजू न घेता मतमोजणी करावी, तक्रारींची दखल घ्यावी, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवले आहे. कोणाच्याही बाजूने कसलीही तक्रार राहू नये असेच काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने काळजी घ्यावी.