कुरुळी : पुणे नाशिक महामार्गावर येथे भरधाव मोटार कारच्या धडकेने पादचारी कामगाराचा मृत्यू झाला. ही शनिवारी पहाटेच्या वेळी घडली. अपघातानंतर संबंधित चारचाकी तशीच पुढे नाशिक दिशेने पसार झाली. या प्रकरणी (दि.२७) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माीहतीनुसार, लक्ष्मण मारुती कोंपलवाड ( वय ४४, सध्या रा. कुरुळी, सोनवणे वस्ती, ता. खेड, मूळ रा. नायगाव जि. नांदेड) असे अपघातात ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत गोविंद विश्वंभर कोंपलवाड ( वय २१, सध्या रा. कुरुळी, ता. खेड, मूळ रा. नांदेड) याने चाकण पोलिसांत फिर्याद दिली आहे. लक्ष्मण हे सोमवारी (दि.२३) सकाळी सहाचे सुमारास पुतण्या गोविंद याच्यासह नेहमीप्रमाणे चाकण एमआयडीसी मधील स्पायसर कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी ( ता. खेड) हद्दीत रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना पुणे बाजू कडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीने (क्र. एम एच १४/ ५४२५) (पूर्ण क्रमांक निष्पन्न नाही) त्यांना चिरडले. अपघातानंतर भरधाव मोटार पुढे जाऊन काही सेकंद थांबली व पुन्हा सुसाट वेगात तशीच पुढे नाशिक दिशेने निघून गेली. गोविंद याने काही मित्रांच्या मदतीने जखमी चुलते लक्ष्मण यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. चाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. असून उपलब्ध झालेल्या मोटारीच्या क्रमांकावरून या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे .
पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने कामगारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 9:50 PM
पुणे नाशिक महामार्गावर येथे भरधाव मोटार कारच्या धडकेने पादचारी कामगाराचा मृत्यू झाला.
ठळक मुद्देचाकण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल