वारजे (पुणे) : दुपारचे साडेतीन वाजलेले... नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला बॅरिकेट्स लावून पुलावरील दुभाजकाला काळा - पांढरा रंग मारण्याचे त्यांचे काम सुरू हाेते. बॅरिकेट्सपासून अगदी १५-२० मीटर अंतर असतानाही भरधाव वेगात आलेल्या कारने त्या दाेघांना उडवले. काही क्षणातच कारच्या बाेनेटवरून उडून पुलाच्या कठड्यावरून ४० फूट खाली काेसळले अन् जागीच ठार झाले. ही घटना मुंबई - बंगळुरू बाह्य वळण महामार्गावर डुक्कर खिंडजवळील वारजे भागात घडली. यात कारमध्ये असलेले चौघेही जखमी झाले आहेत.
सनी गौड (वय २३, रा. सिद्धार्थनगर, युपी) व विजय बहादूर मटरू चौहान (वय २८, रा. वाराणसी, दोघेही सध्या रा. चिखली) अशी मयतांची नावे आहेत, तर लक्ष्मण त्रिंबक देशमुख (वय ६३, रा. धाराशिव), अशोक त्रिंबक देशमुख (वय ५६, रा. शाहूनगर, पिंपरी), रोहिणी अशोक देशमुख (वय ५०), सविता सुरेश मंत्री (वय ५०, रा. केळेवाडी कोथरूड) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कारचालक बाळू महादेव शिंदे (वय ३४, रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरूद्ध वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास देशमुख कुटुंबीय नऱ्हे भागातून आपल्या घरी पिंपरी येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची अल्टो कार (एमएच १४ डीएक्स ९६८८) डुक्कर खिंडीपासून पुढे वसुधा ईताशा सोसायटीच्या समोरील उड्डाणपुलावर आली. यावेळी भरधाव असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला दुभाजकाला पेंट मारत असलेल्या दोन कामगारांना धडक दिली. हे कामगार रस्त्याच्या कडेला बॅरिकेट्स करून रंगकाम करत होते. कामगार काम करत असलेल्या ठिकाणापासून सुमारे १५-२० मीटर लांब बॅरिकेट लावले असूनही, कारने अगदीच पुलाच्या कठड्यांना डाव्या बाजूने घासत या कामगारांना उडवले. हे दोघे कारच्या बोनेटवरून उडून कठड्यावरून सुमारे ४० फूट खाली फेकले गेले. यातील एकजण तर पुलापासूनही ३० फूट लांब खाली रस्त्यावर फेकला गेला. दोघांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
अपघातानंतर या ठिकाणी मोठी वाहतूककोंडी झाली होती. वारजे वाहतूक विभाग व वारजे पोलिस यांनी या ठिकाणी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली. मयत व कारमधील जखमींना जवळच्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कार क्रेनच्या साह्याने वारजे पोलिस ठाणे परिसरात आणून लावण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास उपनिरीक्षक तृप्ती पाटील करीत आहेत. या ठिकाणी वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय कुलकर्णी, सहायक निरीक्षक (वाहतूक) विक्रम मिसाळ यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
चार महिन्यांपूर्वीच झाला होता मुलगा
दोन्ही मयतांचे कुटुंबीय उत्तर प्रदेश येथे राहतात. दोघे कामानिमित्त (पाचशे रुपये रोजंदारी याप्रमाणे) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या एका उपकंत्राटदाराकडे कामाला होते. दोघे कामगार विवाहित असून, तीन - चार महिन्यांपूर्वीच सनी गौड याला मुलगा झाल्याने घरात आनंदाचे वातावरण हाेते. मात्र, अचानक झालेल्या अपघातामुळे घरावर शाेककळा पसरली, अशी माहिती रुग्णालयात उपस्थित त्याच्या सहकाऱ्यांनी दिली.