पुणे : इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षणानंतर भारतीय जनता पार्टीने आता बूथनिहाय नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांची शाळा आयोजित केली आहे. मतदारांशी थेट संपर्क साधणाऱ्या या कार्यकर्त्यांचा तज्ज्ञांकडून खास वर्ग घेण्यात येणार आहे. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे रविवारी (दि. १५) सकाळी ९ ते ११ या वेळात हा वर्ग होईल.‘हजार मतदारांमागे एक कार्यकर्ता’ हा भाजपाचा खास निवडणूक फंडा आहे. महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून भाजपा शहर शाखेच्या वतीने याची रचना करण्यात येत आहे. प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्याला गती देण्यात आली. आता प्रत्येक प्रभागाच्या मतदार यादीतील प्रत्येक हजार मतदारांमागे भाजपाचा एक कार्यकर्ता आहे. ४१ प्रभागांसाठी असे सुमारे २ हजार ७०० हजारी कार्यकर्ते भाजपाने नियुक्त केले आहेत. त्यांचा हा वर्ग घेण्यात येत आहे. त्यात या कार्यकर्त्यांना त्यांनी करायचे काय, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. भारतीय जनता पक्ष प्रभागनिहाय जाहीरनामा करणार असून त्याबाबतही कार्यकर्त्यांना माहिती दिली जाणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश तसेच पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, विजय काळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक यांच्यासह पक्षाचे पालिकेतील सर्व नगरसेवक या वेळी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
उमेदवार प्रशिक्षणानंतर आता कार्यकर्त्यांची शाळा
By admin | Published: January 14, 2017 3:51 AM