लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: महापालिकेचा डीपी रस्ता, वनाज ते गरवारे मेट्रो व पीएमआरडीएची शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो अशा तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये बाधीत होणाऱ्या कामगार पुतळा वसाहतीमधील १ हजार ३०० रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटायला तयार नाही. स्थानिक जागेचा रहिवाशांचा आग्रह कायम असून तशी जागाच नसल्याचे या तिन्ही संस्थांचे म्हणणे आहे.
ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतरही संबंधित तिन्ही संस्था आणि स्थानिकांची संयुक्त बैठक झालेली नाही. एकूण १ हजार ३०० कुटुंबांना या जागेतून स्थलांतर करावे लागणार आहे. महापालिकेने त्यांच्याकडे विविध योजनांमधून आलेल्या सदनिकांमधील काही सदनिका या रहिवाशांना देण्याची तयारी दर्शवली, मात्र या सदनिका हडपसर, कात्रजला आहेत. या ठिकाणी जाण्याची रहिवाशांची तयारी नाही.
मात्र पुनर्वसनासाठी आवश्यक मोठी सरकारी किंवा खासगी जागा उपलब्ध नसल्याने आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन शक्य नसल्याचे संबंधित तिन्ही संस्थांचे म्हणणे आहे. वेगवेगळ्या जागांचे एकूण १५ पर्याय रहिवाशांना दिले आहेत. याला आमचा नकार असल्याचे एका बाधीत कुटुंबाचे प्रमुख भाऊ शिंदे यांनी सांगितले.