लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अर्धे कामगार कोरोनामुळे गावी निघून गेले, तरीही आहे त्या कामगारांमध्येच महामेट्रो कंपनीने मेट्रोचे काम सुरू ठेवले आहे. भुयारी मार्ग आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
मेट्रो कामावरील ६ हजारांपैकी ३ हजार कामगार निघून गेले असल्याचे जनसंपर्क संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले. उपलब्ध कामगारांचे नियोजन करून काम केले जात आहे.
शिवाजीनगरपासून सुरू झालेला भुयारी मार्ग आता मुठा नदीखालून पुढे कसबा पेठेकडे चालला आहे. भुयाराचे खोदकाम यंत्राद्वारे चालते. त्याला कामगार कमी लागत असल्याने यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. कसबा पेठेत महापालिकेच्या बंद असलेल्या दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. तेथील जमिनीच्या खाली साधारण ३० मीटर खोलीवर येत्या महिनाभरात मेट्रोचा बोगदा पोहचेल.
वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गाला मेट्रोने प्राधान्य दिले आहे. स्थानकांचे काम बाकी आहे. त्यातही आयडियल कॉलनी व गरवारे महाविद्यालय स्थानकाला महत्व देण्यात आले आहे. गरवारे महाविद्यालय स्थानकाच्या भिंती तयार झाल्या असून आता छत टाकण्याचे काम सुरू आहे. याच मार्गावर सोनल हॉल ते एसएनडीटी महाविद्यालय दरम्यान पुण्यातील पहिल्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
चौकट
“भूयारी मार्गाचे काम आव्हानात्मक आहे. नदीखालून बोगदा नेताना कौशल्य पणाला लावावे लागले. काटेकोर नियोजन व यंत्रांची मदत यामुळे भुयारी मार्ग विहित वेळेपेक्षा लवकर पूर्ण करू.”
-अतुल गाडगीळ, संचालक, प्रकल्प
चौकट
कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी- ८ हजार कामगार
लाट सुरू झाल्यावर शिल्लक कामगार- फक्त ८००
दुसर्या लाटेपूर्वी- ६ हजार.कामगार
लाट सुरू झाल्यावर - ३ हजार कामगार.