निगडी : शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर काम करणारे कामगार सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांना मिळणा-या सोयीसुविधा अपु-या असल्याने त्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. रोजंदारीवर कामास ठेवून कामापुरता त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे सेवासुविधांपासून त्यांना वंचित ठेवले जाते. या कामगारांना काम करीत असताना कोणतीही सुरक्षेची साधने दिली जात नाहीत. रस्त्याचे काम सुरू असताना गरम डांबराचे चटके सहन करावे लागतात, तर दिवसभर रस्त्यावरील धुळीशी सामना करावा लागतो. अशातच येथील कामगारांना ठेकेदाराकडून सेफ्टी शूज, मास्क, सेफ्टी गॉगल यांसारखी सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली जात नाहीत. यामुळे कामगारांना डांबर भाजण्याच्याही वारंवार घटना घडत आहेत. यामध्ये महिला कामगारांचे प्रमाणही मोठे असते. महिला कामगारांना स्वत:चे धुळीपासून रक्षण होण्यासाठी स्वत:चा स्कार्फ तोंडाला बांधावा लागत आहे. यामुळे या कामगारांना दमा, हृदयरोग, खोकला, सर्दी यांसारख्या आजारांशी वर्षभर सामना करावा लागतो. कायद्यातील तरतुदीनुसार औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा नियमांचे पालन बंधनकारक आहे. परंतु रस्ते सुधार विभागाकडून या सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अशा कामगारांच्या जिवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)मुले रस्त्यावर : गर्भवतींनाही अवजड कामे रस्ते बनविण्याच्या कामावर गर्भवती आढळून येत आहेत. शारीरिक श्रम असणा-या कामावर संबंधित अधिकारी अशा गर्भवतींना काम करण्यास कशी काय परवानगी देतात, असाही प्रश्न जागरूक नागरिक उपस्थित करीत आहेत. तसेच रस्त्याचे काम करणा-या कामगारांची मुले सर्रासपणे कामाच्या ठिकाणी येतात. ही मुले दिवसभर उन्हात, रस्त्यावरील खडी, धुळीमध्ये खेळत असतात. यामुळे त्यांचा आरोग्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. हे कामगार आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात. यामुळे रस्ते कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. महिन्यातील तीसही दिवस राबतात कामगारजाधववाडी : कुदळवाडी येथील भंगार दुकानात मोठ्यांसोबतच लहानग्यांचेही शेकडो हात राबत असतात. मात्र या कामगारांसाठी कोणतेही शासकीय धोरण नसून महिन्यातील तीसही दिवस अनेक कामगार राबत असतात. त्यांना कामगार दिनाची हक्काची सुटीदेखील नाही. कोणत्याही शासकीय सुविधा नाही, ना त्यांच्या पायात व डोक्यावर कोणतेही सुरक्षेचे साधन नाही. कुदळवाडीतील काही कंपन्यांतही अनेक कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.कामगारांना अनेक कंपन्यांत कंत्राटी पद्धतीने भरती करवून घेऊन पिळवणूक सुरू आहे. ना ईएसआयसी ना पीएफ. काही कामगारांना पीएफ आहे. परंतु कंत्राटदारातर्फे त्यांची फसवणूक होत आहे. सरकारी नियमांनुसार १८० एक कंत्राटी कामगार एकाच कंपनीत काम करू शकत नाही. त्यामुळे कंत्राटदार त्या व्यक्तीला मधूनच ब्रेक देतो व काही दिवसांनी पुन्हा कामावर घेतो. यात अनेक कामगार कमी शिकलेले असतात. त्यामुळे त्यांच्या पीएफचा प्रश्न तसाच मागे पडतो.
सुरक्षा साधनांशिवाय राबताहेत कामगार
By admin | Published: May 01, 2017 2:47 AM