घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांची एक वेगळीच ‘परीक्षा’ पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे यांनी घेतली. अचानक भेटी देऊन पाहणी करण्यापेक्षा दूरध्वनीवरून फोन करून समान्य नागरिकांना हे लोक कसा प्रतिसाद देतात, याची पडताळणी केली. लगेच गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. या ठिकाणी कर्मचारी थांबत नाही, कामावर हजर नसतात, लोकांशी सौजन्याने वागत नाहीत...अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी पंचायत समितीकडे आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा तोंडी व लेखी सूचना देऊनही काही फरक पडत नव्हता. म्हणून आज दवाखाने व शाळा या ठिकाणी अचानक भेटी देण्यापेक्षा तळपे यांनी नामी शक्कल लढवली. पंचायत समितीमध्ये विभागप्रमुखांना घेऊन संबंधित डॉक्टर, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ग्रामीण बोली भाषेत सर्वसामान्य नागरिक असल्यासारखे बोलून या कर्मचाऱ्यांची लोकांच्या तक्रारी सोडविण्याची पद्धत, उपस्थितीची पडताळणी केली. मोबाईलवर बोलताना, डॉक्टरसाहेब गाई खाली व्हायला आली, येता का?’ गुरूजी शाळेतून दाखला पाहिजे आहे, आहे का तुम्ही? गुरूजी शाळेत तुम्ही दिसत नाहीत. कुठं बाहेर गावी गेलात का? अशा प्रकारे गावकरी बोलत असल्याचे सांगत अनेकांना उलट प्रश्न केले. यामध्ये अनेक जण खोटे बोलताना आढळून आले. पाटणच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने ट्रेनिंगसाठी वडगाव मावळला असल्याचे सांगितले. तर, एका मुख्याध्यापकाने घोडेगावला मिटिंगला असल्याचे सांगितले. यामध्ये चार पशुवैद्यकीय अधिकारी, दोन उपकेंद्रातील डॉक्टर, काही मुख्याध्यापक यांना कामाव्यतिरिक्त बाहेर फिरताना पकडले. लगेच गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले.
प्रतिसादाची पडताळणी : मोबाईलवरून असा झाला संवादशेतकरी : डॉक्टर साहेब, माझी म्हैस लय आजारलीय, येता का पाहायला.डॉक्टर : काय झालं तिला. शेतकरी : मला समजलं असतं, तर तुम्हाला कशाला फोन केला असता.डॉक्टर : पुढचं बोलू नका, मी पुण्याला ट्रेनिंगला आहे. शिपाई पाठवतो.शेतकरी : साहेब तुमचं ट्रेनिंग आहे, बरोबर हाय. पण शिपाई काय करणार. माझं नुकसान होईल.डॉक्टर : मी आता काही करू शकत नाही. उद्या येतो.शेतकरी : साहेब, उद्या माझ्याकडं नका येऊ. पंचायत समितीमध्ये या. तुमचं कुठं ट्रेनिंग होतं ते पाहू. हा संवाद आंबेगाव पंचायत समितीचे उपसभापती सुभाष तळपे व बोरघर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यातील आहे.