- श्रीकिशन काळे
पुणे : पिकांचे सर्वाधिक परागीभवन मधमाशा करतात. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मधमाशांची आवश्यकता असते. पण त्यांना राहण्यासाठीचे मोठे वृक्ष कमी होत आहेत. शहरात तर आता मोठी झाडेच नसल्याने मधमाशा इमारतींवर पोळे करत आहेत. पण त्यांना अन्नाचा तुटवडा आहे. कारण त्यांच्यासाठी माती गरजेची असते आणि मकरंद असणारी झाडे हवी असतात. काँक्रिटीकरणाच्या हव्यासामुळे शहरात आता रस्त्यांवरही माती राहिली नाही. परदेशी झाडांच्या आक्रमणामुळे फुले असणारी झाडेही कमी होत आहेत.
मधमाशा संवर्धनाचे काम करणारे देवेंद्र जानी यांनी स्वत:च्या घरात मधमाशी पालन केले आहे. त्यांना योग्य पोषक वातावरण दिले, तर त्यांचे संवर्धन होऊ शकते. याविषयी जानी म्हणाले,‘‘मी काही वर्षांपूर्वी प्लास्टिक बाटल्यांमध्ये टोमॅटो, मिरची, पुदिना लावला होता. पण त्यातील टोमॅटोची वाढ होत नव्हती. मोहोर येत नव्हता. मी जेव्हा निरीक्षण केले, तेव्हा मधमाशा तो मोहोर घेऊन जायच्या. कारण टोमॅटोचे सर्वाधिक परागीभवन मधमाशा करतात.’’
मधमाशांच्या पोळ्यामध्ये राणी माशी हीच मुख्य असते. इतर मधमाशांपेक्षा ती आकाराने मोठी असते. कामकरी माशा या लहान, नर (ड्रोन) माशा थोड्या मोठ्या आणि सर्वात मोठी राणी माशी असते. हजारो मधमाशा या पोळ्यामध्ये असतात. त्या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम राणी माशी करते. ड्रोन माशा काहीच करत नाहीत. बिनकामाच्या असतात. कामकरी व राणी माशी या पोळे तयार करण्यात मोठी कामगिरी करतात. त्या जागा निवडतात, त्यानंतर स्वच्छता करतात. स्वच्छ व सुरक्षित वाटल्यानंतर तिथे पोळे तयार करतात. पोळ्याची रचनादेखील षटकोनी आकाराची बनवतात. कारण त्यामुळे जागा वाया जात नाही. ही त्यांची एक अनोखी शिकण्यासारखी गोष्ट आहे.
डान्स करून सांगतात मधाचा मार्ग-
मधासाठी फुले कुठे आहेत, ते ठिकाण माशा एकमेकांना डान्स करून सांगतात. नेमके कुठे आणि कसे जायचे ते देखील सांगतात. एकाच फुलावरून ते मध आणतात. त्यामुळे जांभूळ, कडुनिंब मध म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. त्या-त्या झाडाचा मकरंद त्या घेत असतात.
लहान दिसणाऱ्या आणि काटा नसणाऱ्या मधमाशांचे घर हे गोलाकार मातीचे असते. त्यातील मध औषधी असतो. अनेक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. कारण या मधमाशा औषधी वनस्पतींवर जाऊन करंद गोळा करतात. उदा. तुळशी.
तीन हजार वर्षांपासून जपलेले मधही खाण्यायोग्य
अगदी महिना दोन महिने शिळे झाले तरी अनेक खाद्यपदार्थ आपण खाऊ शकत नाही. मध मात्र तीन हजार वर्षे जुने असलेले मधही आपण खाऊ शकतो. ही मधमाशांची किमया आहे. त्याचबरोबर ८० टक्के परागीभवन मधमाशांकडून होते. जर मधमाशा संपल्या, तर कोणत्याही झाडाला फळे लागणार नाहीत.