पुणे : रक्तदान हे वर्षातून केवळ चार वेळाच करू शकतो. परंतु, प्लेटलेट दान हे आपण वर्षातून २४ वेळा करू शकतो. तसेच यामुळे अनेकांचा जीवदेखील वाचू शकतो. रक्तदानासोबतच या प्लेटलेट दानाबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. मानवी शरीरात दीड लाख ते चार लाख प्लेटलेट्स असतात. सध्याच्या परिस्थितीत गंभीर आजारामुळे प्लेटलेटची कमतरता भासू लागली आहे. रँडम डोनर प्लेटलेट (आरडीपी) आणि सिंगल डोनर प्लेटलेट (एसडीपी) हे प्लेटलेटदानाचे दोन प्रकार आहेत. रक्तदाता व्यक्तीकडून रक्त घेतल्यावर त्यावर आरडीपी प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेत प्लेटलेट वेगळे केले जातात. रक्तही वेगळे केले जाते. एसडीपी प्लेटलेटदानात हे सेल्स सेप्रेटर या मशिनमधून अफेरेसिस या तंत्रज्ञानाच्या आधारे केले जाते. या यंत्रणेच्या साहाय्याने रक्तातील केवळ प्लेटलेट काढून घेतले जातात. उर्वरित रक्त दात्याच्या शरीरात परत सोडले जाते. एका प्रक्रियेसाठी दीड ते दोन तास लागतात. प्रक्रियेनंतर ४८ तासांत प्लेटलेट पुन्हा भरून येतात. वर्षातून २४ वेळा प्लेटलेटचे दान करता येते..............
एसडीपीची एकच पिशवी फायदेशीर
कॅन्सर, लिव्हर, किडनी ट्रान्सप्लान्ट, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, डेंग्यू, मलेरिया अशा गंभीर आजारांमध्ये प्लेटलेटची गरज भासते. आरडीपीमध्ये ७० मायक्रोलिटर प्लेटलेट तयार होतात. तर एसडीपीमध्ये २५० मायक्रोलिटर प्लेटलेट तयार होतात. हे आजार झालेल्या रुग्णाला जास्तीत जास्त प्लेटलेटची गरज असते. त्यामुळे रुग्णांसाठी आरडीपीच्या चार पिशव्यांची गरज लागते. पण एसडीपीची एकच पिशवी फायदेशीर ठरते. एसडीपी प्रक्रियेत ४८ तासांच्या अंतरावर आपण प्लेटलेट दान करू शकतो. पण रक्तपेढी आणि हॉस्पिटलच्या नियमानुसार आठवड्यातून दोन वेळा प्लेटलेटदान करता येते.
१८पासून ते ६० वर्षांपर्यंतची कोणतीही व्यक्ती एसडीपी प्लेटलेटदान करू शकते. त्यासाठी ६० किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजन असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा अधिक आणि प्लेटलेट संख्या दीड लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.
* एसडीपी आधुनिक यंत्रणेत ही मशिन गरजेनुसार प्लेटलेट काढून घेते. त्या व्यक्तीला प्लेटलेटदान केल्यावर कुठलीही हानी होणार नाही. याची मशिनद्वारे दक्षता घेतली जाते. रक्तातून वेगळे केलेल्या प्लेटलेट्सचे आयुर्मान चार ते पाच दिवस असते. एखाद्या व्यक्तीकडून हे प्लेटलेट्स घेतल्यावर ते नष्ट होण्याअगोदर आजारी असलेल्या रुग्णाला दिले जातात. सामान्य माणसाच्या एक मायक्रोलिटर रक्तात कमीत कमी दीड लाख प्लेटलेट असतात. तर त्याच्या शरीरात चार ते पाच लिटर रक्त असते.
.............पुण्यात दीनानाथ, सह्याद्री, रुबी हॉल अशा रुग्णालयात ही एसडीपी सेवा चालू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आमच्या रक्तपेढीत हे सेवा चालू आहे. मागच्या वर्षी आम्ही हजार प्लेटलेट दात्याकडून हजार रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. नागरिकांना एसडीपीबद्दल अपूर्ण माहिती असल्याने ते एसडीपी प्लेटलेटदान करत नाहीत. लोकांना गंभीर आजरांपासून वाचवण्यासाठी या दानाची गरज आहे. यासाठी दीड ते दोन तास द्यावे लागतात. म्हणून शक्यतो कोणीही एसडीपी प्लेटलेटदान करण्यास पुढाकार घेत नाही. प्लेटलेटची गरज भासली की आम्ही प्लेटलेटदात्याला बोलावून घेतो. - डॉ. अतुल कुलकर्णी, संचालक, जनकल्याण रक्तपेढी..........मी आतापर्यंत १४८ वेळा प्लेटलेटदान केले आहे. गेली दहा वर्षे करत आहे. यामुळे शरीराला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. एकदा शरीरातील प्लेटलेट दान केले की पुन्हा तयार होण्यासाठी ४८ तासांचा कालावधी लागतो. रक्तदान करणे गरजेचे आहे. परंतु, सद्या प्लेटलेटदान करण्याची गरज आहे. मनात भीती न बाळगता प्लेटलेटदान करावे. - चेतन वाळिंबे, प्लेटलेटदाता