पुणे :पुस्तकांची दुकाने किंवा वाचनालय तर सर्वांना माहिती आहेच. पण पुण्यात आहे पुस्तकांचे फिरते वाचनालय. बाजीराव रस्त्यावरील सरस्वती विद्या मंदिरच्या समोर १९४८पासून आठवले कुटुंब जुनी पुस्तके विकत आहेत. त्यांचा संग्रह इतका प्रसिद्ध आहे की लोक स्वतःहून त्यांना शोधत येतात. पुस्तकांना आयुष्याचे जोडीदार मानणाऱ्या आठवले कुटुंबाची ही कहाणी.
वसंत आठवले हे सध्याच्या वयाच्या ७७व्या वर्षी सकाळी पुस्तक विक्री करतात. साधारण १९४८साली त्यांचे वडील यशवंत आठवले यांनी हे काम सुरु केले. गंधर्व नाटक कंपनी बंद पडल्यावर त्यांनी लोकांकडून पुस्तक घेऊन विक्रीचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकाळापासून आठवले यांचे दुकान दुर्मिळ पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे.सध्या वसंत यांच्यासह त्यांचा मुलगा धनंजय असे दोघेही हा व्यवसाय करत आहेत.त्यांच्या घरातला प्रत्येक कोपरा पुस्तकांनी भरला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, दिवंगत रां.चिं ढेरे, निरंजन घाटे असे अनेक लेखक मान्यवर त्यांच्या बुक स्टोलला आवर्जून भेट द्यायचे. याशिवाय भांडारकर इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधन मंडळ अशा अनेक संस्थांचे वाचनालये आठवलेंकडच्या पुस्तकांनी समृद्ध झाली आहेत.
याबाबत वसंत आठवले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अजूनही पुस्तकांना तितकीच मागणी असल्याचे सांगितले. कितीही ऑडिओ बुक किंवा ऑनलाईन बुक आले तरी हातात पुस्तक घेऊन वाचणाऱ्यांची संख्या कधीही घटणार नाही असेही ते म्हणाले. आजही आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्या पुस्तकांना तितकीच मागणी असून तरुणांना ज्योतिषशास्त्राची पुस्तके वाचण्यात रस असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकांच्या आठवणी सांगण्यापेक्षा आयुष्यातला एकही दिवस त्यांच्याविना गेला नसल्याचे ते सांगतात. दुर्मिळ पुस्तक मिळाल्यावर खजिना हातात आल्याचा आनंद होतो असेही ते म्हणाले. एकदा तर एका व्यक्तीकडून जुनी आणि दुर्मिक पुस्तक विकत घेण्यास पैसे नसल्याने अंगठी गहाण ठेवल्याची आठवण त्यांनी सांगितली. ही पुस्तके माझी संपत्ती असून त्यांच्या असण्याने आयुष्य समृद्ध झाल्याचे सांगताना त्यांचे डोळे भरून येतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना 'यंग इंडिया' मासिकांचे अंक आठवले यांनी विमानाने दिल्लीला पाठवले आहेत. २०१०साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे उदघाटन करणे हा आयुष्यातला सुवर्ण योग होता, त्यामुळे समाधानी असल्याचे ते नमूद करतात. माणसांच्या घरात पुस्तक आहेत असं म्हणण्यापेक्षा पुस्तकांच्या घरात राहत असलेले ही पुस्तकप्रेमी माणसे रोजच पुस्तक दिन साजरा करत आहे.