- डॉ. नीरज जाधव
पुणे : कर्कराेगाने हाेणाऱ्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू हे गर्भाशय मुखाच्या कर्कराेगाने म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सरने हाेतात. आतापर्यंत साधारणपणे ४० नंतरच्या वयाेगटांतील महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण आढळून येत हाेते; मात्र कमी वयाच्या महिलासुद्धा या सर्व्हायकल कॅन्सरला बळी पडत असून, त्यांचे प्रमाणही माेठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
अभिनेत्री पूनम पांडे या मॉडेल व अभिनेत्रीने आपला गर्भाशय मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे, अशी समाजमाध्यमांत पाेस्ट केली. नंतर सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागृती करण्याच्या हेतूने आपण आपल्या मृत्यूची पाेस्ट केल्याचा खुलासा तिने दुसऱ्या पाेस्टद्वारे केला. आज देशामध्ये दर सात सेकंदांनी एका महिलेचा मृत्यू सर्व्हायकल कॅन्सरने हाेत आहे. साहजिकच जागतिक कर्कराेग दिनाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कर्कराेगाबाबत आता गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले आहे, त्याबाबत जागरूक राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
ही लक्षण आढळताहेत, डाॅक्टरांना गाठा!
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस या लैंगिकदृष्ट्या संसर्गित होणाऱ्या विषाणूचा दीर्घकालीन संसर्ग हेच बहुतांश गर्भाशय मुखाच्या कर्करोगांचे मूळ आहे. अस्वस्थ, अनियमित मूत्रप्रवृत्ती; कंबरदुखी, ओटीपोटात दुखणे, दुर्गंधीयुक्त श्वेत रजस्राव, लैंगिक संबंधानंतर होणारा रक्तस्राव, दोन मासिक पाळ्यांदरम्यान होणारा रक्तस्राव तसेच वजन कमी होणे अशा प्रकारची लक्षणे गर्भाशय मुखाच्या कर्करोगामध्ये दिसून येतात. काही वेळा कोणतेही लक्षण नसतानादेखील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते.
प्रतिबंध हा महत्त्वाचा उपाय
लसीकरण हा एक प्रतिबंधात्मक उपायाचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नऊ वर्षे ते चाैदा वर्षे वयाेगटातील मुलामुलींसाठी ‘गर्डेसिल-९’ ही लस घेणे गरजेचे आहे. पंधरा वर्षांहून अधिक वयाेगटांतील मुलामुलींसाठी या लसीचे दाेन डाेस सहा ते बारा महिन्यांच्या अंतराने दिले जाणे आवश्यक आहे. २६ वर्षांपुढील स्त्री-पुरुषांसाठी सहा महिन्याच्या अंतराने तीन डोस दिले जाणे आवश्यक आहे.
याला प्रतिबंध करायचा तर सर्वांत महत्त्वाचे आहे. यासाठीचे लसीकरण करून घेणे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी ‘गर्डेसिल ९’ ही लस स्त्री आणि पुरुष दोघांसाठी उपलब्ध आहे. लैंगिकदृष्ट्या स्त्री अथवा पुरुष सक्रिय होण्यापूर्वीची वेळ ही लस घेण्याची योग्य वेळ आहे; कारण ह्युमन पॅपिलोमाव्हायरस हा विषाणू लैंगिक संबंधामुळे संसर्गित होणारा विषाणू आहे. त्यामुळे नऊ वर्षे ते चौदा वर्षे या वयोगटांमध्ये ही लस प्रामुख्याने दिली गेली पाहिजे. पंधरा वर्षाहून अधिक वयाच्या लोकांसाठी या लसीचे दोन डोस सहा ते बारा महिन्यांच्या अंतराने दिले जाणे आवश्यक आहे. २६ वर्षांपुढील लोकांसाठी या लसीचे सहा महिन्यांच्या अंतराने तीन डोस दिले जाणे आवश्यक आहे.
असे केले जातात उपचार
सर्व्हायकल कॅन्सरवरील उपचारासाठी स्क्रीनिंगदरम्यान ‘प्याप स्मीयर’ नावाची तपासणी याकरता केली जाते, ज्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या त्वचेचा तुकडा काढून निदान केले जाते. केवळ गर्भाशय मुखापुरता मर्यादित असणारा कर्करोग रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करून बरा करता येतो. शस्त्रक्रियेमध्ये गर्भाशय, गर्भाशय मुख आणि योनिमार्गाचा वरील भाग यांसह संसर्गित झालेल्या लसिका ग्रंथी काढून टाकल्या जातात. यासह आजाराच्या विविध अवस्थांनुसार रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि लक्ष्यित उपचार यांच्या आधारे गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर उपचार केले जातात.
त्रिसूत्रीचा अवलंब करा अन् कॅन्सरला दूर ठेवा!
यंदाच्या गर्भाशय मुखाच्या कर्कराेगाच्या जनजागृती महिन्याची मुख्य थीम माहिती करून घ्या, प्रतिबंध करा आणि तपासणी करा, या त्रिसूत्रीचा प्रत्येक महिला आणि त्याच्या पुरुष जाेडीदाराने अवलंब केला, तर गर्भाशय मुखाच्या कर्कराेगावर विजय मिळवणे शक्य आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्कराेग प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व जितके स्त्रियांमध्ये आहे, तितकेच ते पुरुषांमध्येदेखील आहे; कारण ‘ह्युमन पॅपिलोमाव्हायरस’ हा विषाणू प्रामुख्याने पुरुषामार्फत संसर्गित होतो. पुरुषांसाठी या लसीचा केवळ एक डोस घेणेदेखील पुरेसे आहे.
- डॉ. हेमलता जळगावकर, स्त्रीराेगतज्ज्ञ व प्राचार्य, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय