पुणे : सध्या ‘म्याँव, म्याँव’ असा आवाज आता अनेक घरांमधून येऊ लागला आहे. कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात घरात एखादा प्राणी असेल तर त्याच्याशी लळा लागतो आणि कोणताही ताण असेल तर तो निघून जातो. त्यामुळे मांजर आता घरातील सदस्य बनत आहे. परंतु, कोरोनाच्या काळात अनेकांनी मांजरीला बेवारसपणे घरापासून दूर सोडल्याच्या घटना समोर आल्या होत्या; पण योग्य काळजी घेतली, तर मांजरीमुळे घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होत आहे.
दरवर्षी ८ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय मांजर दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मांजरीचे संरक्षण करणे आणि मदत करणे हा आहे. शिवाय मांजरीविषयी लोकांना जागरूक करणे आहे. आधुनिक काळात मांजर पाळण्याचे प्रमाण वाढले आहे.
...म्हणून तीनपट उंच उडी
मांजर हा असा प्राणी आहे जो दिशा लक्षात घेऊन घरी परत येतो. माणसाच्या शरीरात एकूण २०६ हाडे असतात, परंतु मांजराच्या शरीरात २८० हाडे असतात. म्हणून मांजर आपल्या उंचीच्या तीनपट उंचीवर उडी मारून सुरक्षित अवस्थेत परत जमिनीवर येतात. त्यांच्यात लवचिकता खूप असते. चपळता देखील असते.
मांजरही बोलते...
मांजरीची रात्रीची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता चांगली विकसित झालेली आहे. मांजरीच्या बोलण्याचे प्रकारामध्ये म्याँव म्याँव करणे, गुरगुरणे, फुसफुसने, कंपयुक्त आवाज करणे, कल्लोळ करणे, तसेच मांजरींच्या विशिष्ट शारीरिक भाषेचा समावेश आहे. ही भाषा जाणकारांनाच समजते.
सोशल मीडियावर मांजरप्रेमी ग्रुप
मांजरप्रेमी हा गट जे कुणी मांजर या प्राण्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी अरुणा पेेंडसे यांनी फेसबुकवर तयार केला आहे. या ग्रुपमधील सभासदांना मांजरांबद्दलचे प्रेम हा जोडणारा एक दुवा आहे. मांजरांविषयीच्या माहितीची देवाणघेवाण व्हावी, त्यांचे फोटो, व्हिडिओ क्लिप्स शेअर कराव्यात एवढीच अपेक्षा या ग्रुपची आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या पोस्टस ग्रुपमध्ये चालत नाहीत. मांजरीला काही दुखलं-खुपलं तरी त्यावर इथे मार्गदर्शन मिळते.
मला एकच मुलगा आहे. मला सतत भीती होती की, तो एकलकोंडा होईल; पण ही भीती माझ्या घरातील दोन व्यक्तींमुळे दूर झाली. एक म्हणजे माऊ आणि दुसरा टॉमी. हे प्राणी असले तरी आमच्या घरातील सदस्य आहेत. या प्राण्यांशी मुलाचं नातं खूप घट्ट आहे. त्यामुळे तो संवेदनशील झाला, प्रेमळ बनला. घरात माऊ असल्याने झुरळ, पाली घरात येत नाहीत आणि सापापासूनही संरक्षण होते. त्यांना संकटाची चाहूल होते. थोडक्यात, मांजर माझ्या घरचा वॉचमन आहे.
- नेहा खांदवे, मांजरप्रेमी