- युगंधर ताजणे पुणे : फ्लॅटचे पूर्ण पैसे घेऊन त्यांना वेळेवर घराचा ताबा न देणे, खरेदीचा व्यवहार करताना करारात नमूद केलेल्या गोष्टीची पूर्तता न करणे, सतत बहाणा व खोटे बोलून वेळ मारून नेत ग्राहकांना फसवणूक करण्याचे काम बिल्डर करत असून, त्यांच्या विरोधात शहरी व ग्रामीण भागातून तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या विरोधात आतापर्यंत (ग्राहक न्यायालयाची सुरुवात झाली तेव्हापासून) शहरी भागातून ४ हजार ५०५, तर ग्रामीण भागातून ४ हजार ११७ तक्रारी या केवळ बिल्डरांविरोधात दाखल झाल्या आहेत.इमारतीचा मूळ ढाचा उभारल्यानंतर, ग्राहकाकडून टप्प्या-टप्प्याने पैसे घेऊन वेळेवर ब्लॉकचा ताबा देण्याचा वादा बिल्डरकडून केला जातो; मात्र प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणीची वेळ येते, तेव्हा त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जाते. पुणे शहरी भागात गेल्या तीन वर्षांत २२९६, तर ग्रामीण भागातून २००५ विविध प्रकारच्या ग्राहक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल खडसे यांनी सांगितले, ग्राहकांना वेळेत फ्लॅटचा ताबा न देणे, त्यांना फ्लॅट घेताना ज्या सोयी-सुविधा देण्याची हमी दिलेली असते त्या न देणे, पैशांची फसवणूक याबरोबरच बिल्डरकडून फ्लॅट ताब्यात देताना बांधकामात राहिलेल्या काही त्रुटी याविषयीच्या तक्रारींचा समावेश अधिक आहे. बिल्डरवर गरजेपेक्षा जास्त ठेवलेला विश्वास हा अनेकदा ग्राहकांना डोकेदुखी ठरताना दिसतो. विशेष म्हणजे, यात सुशिक्षित ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात देखील तीच परिस्थिती आहे. यामुळे ग्राहकांनी चौकस राहून आपली फसवणूक होऊ नये, याकरिता काळजी घेणे गरजेचे आहे.शेतकरी विमा योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारीची आकडेवारीदेखील मोठी असून, याबाबत दाद मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या चकरा ग्राहक न्यायालयाकडे वाढल्या आहेत. पतसंस्थेकडून कर्ज देण्याच्या निमित्ताने झालेली फसवणूक; तसेच दैनंदिन ठेव पतसंस्थेत जमा करून, ती पुन्हा न मिळणे, पेन्शन मिळणे विषयीच्या तक्रारीबाबत न्याय मागण्याकरिता ग्राहकांची संख्या वाढत आहे.आरोग्य विमा, डॉक्टरांकडून चुकीचे उपचार, एखाद्या शिक्षण संस्थेच्या विरोधात, याबरोबरच कारचालक, आॅनलाइन वस्तूंची खरेदी यात झालेल्या फसवणुकीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.शहरी भागातून ‘इतर’ या प्रकारातून आतापर्यंत १०, ९७१ तर ग्रामीण भागातून २८७५ तक्रारी ग्राहक न्यायालयाकडे आल्या आहेत. हेअर ट्रान्सप्लँट करताना त्यातून अनेकांना होणारे त्वचेचे आजार, टक्कल पडणे; तसेच हेअर कलर करण्यासंबंधीच्या तक्रारी न्यायालयाकडे येत आहेत.सौंदर्यप्रसाधनांची खरेदी करताना महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत असून, ब्युटी पार्लरमधून जादा पैसे आकारून दिलेल्या निकृष्ट सेवेबद्दल महिलांनी तक्रारी केल्या आहेत. याबरोबरच तरुण-तरुणींचे विवाह लावणाºया अनेक मॅरेज ब्युरो, मॅरेज पार्टी, वेबसाइट यांच्या विरोधात तक्रारी महिलांकडून आल्याचे ग्राहक मंचच्या सदस्या अॅड. क्षितिजा कुलकर्णी म्हणाल्या.अनेकदा ग्राहकांची बाजू सत्य असतानादेखील पुरेसे व योग्य पुरावे उपलब्ध होत नाहीत. याचा फायदा फसवणूक करणाºया एखाद्या संस्थेला, कंपनीला अथवा व्यक्तीला होतो. आतापर्यंत ग्राहक न्यायलयात दाखल तक्रारी आणि निवाडा याची आकडेवारी पाहिल्यास त्यांना न्याय मिळण्याची टक्केवारी ८० टक्के आहे.- अनिल खडसे, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
जागतिक ग्राहक दिन: ‘पझेशन’साठी ग्राहकांना बिल्डरांकडून सर्वाधिक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 4:08 AM