पुणे : मधुमेहाचे वाढलेले प्रमाण, बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्यात झालेले बदल आदी कारणांमुळे किडनी (मूत्रपिंड) निकामी हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यापेक्षाही विदारक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर अवयवदान न केल्याने अनेकांना किडनी मिळत नसल्याचे दिसते. परिणामी पुणे विभागात सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर किडनी प्रत्यारोपण केले आहे.
किडनीबाबत जनजागृती करण्यासाठी मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार हा जागतिक किडनी दिन म्हणून पाळण्यात येताे. मूत्रपिंड किंवा किडनी ही आपल्या शरीरातील टाकावू पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकून देणारे एक विशेष फिल्टर प्रणाली आहे. रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे त्याचबराेबर रक्तातील सोडियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांसारखे घटक क्षार आणि खनिजे यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
आपल्या शरीरात पाेटात दाेन्ही बाजूंला दाेन किडनी असतात. खरे तर एकच किडनी पुरेशी असते; मात्र दुसरी किडनी ही दाेन्हींपैकी एखादी खराब झाल्यास बॅकअप म्हणून काम करीत असते. जेव्हा या दाेन्ही किडनी खराब हाेतात किंवा त्या काम करणे थांबवतात तेव्हा त्या रुग्णाला दिवसाआड डायलिसिस म्हणजे कृत्रिम मशीनद्वारे रक्त शुद्धीकरण करावे लागते. ही बाब त्या रुग्णाच्या वैयक्तिक जीवनात त्रासदायक ठरते. त्यावर एकच उपाय आहे ताे म्हणजे किडनी प्रत्यारोपण.
सध्या मेडिकल सायन्स खूप पुढे गेले आहे. त्यामुळे किडनी प्रत्याराेपणाद्वारे एखाद्याला पूर्ववत चांगले जीवन मिळू शकते; मात्र त्याबाबत असणारे गैरसमज, जनजागृतीचा अभाव, पैशांची कमतरता आदी कारणांमुळे किडनी प्रत्यारोपण हाेत नाही. हे प्रमाण वाढायला हवे. आपल्याकडे ब्रेनडेड झालेल्या रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे; मात्र अनेक घटकांकडून सहकार्य हाेत नसल्याने त्या रुग्णांचे अवयव दान हाेत नाहीत.
पुणे विभागात गेल्या पाच वर्षांत केवळ २४७ जणांवर ब्रेनडेड व्यक्तींद्वारे किडनी प्रत्यारोपण केले आहे. तर सध्या १६७२ रुग्ण किडनीसाठी वेटिंगवर आहेत. अवयवदान वाढायला हवे.
- आरती गाेखले, समन्वयक, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती, पुणे