पुणे : फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपान केल्याने हाेताे हे माहीत आहे. मात्र, आता वाढते प्रदूषण, पॅसिव्ह स्माेकिंग या कारणांमुळेदेखील फुफ्फुसाचा कॅन्सर हाेण्याचे प्रमाण वाढत आहे, असे फुफ्फुसविकार तज्ज्ञांचे मत आहे.
फुफ्फुस कॅन्सरबाबत जागृती करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्ट हा जागतिक फुप्फुस कॅन्सर दिन म्हणून पाळला जातो. धूम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण मानले जाते. फुफ्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे ८० टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण १५ ते ३० टक्क्यांहून अधिक असते; परंतु धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सान्निध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो. कारण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. एका सर्वेक्षणानुसार जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाचा बळी ठरत आहे, असे कॅन्सरतज्ज्ञ सांगतात.
कॅन्सरच्या एकूण प्रकारांपैकी सर्वाधिक प्रमाण म्हणजे ११.६ टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहे. या रोगाच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक १८.४ टक्के आहे. पहिल्या टप्प्यात हा कर्करोग फुफ्फुसांमध्ये आढळतो; परंतु शरीराच्या इतर भागांमध्ये पसरत नाही. सुरुवातीच्या टप्प्यात उपचार केल्याने रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. दुसऱ्या टप्प्यात, लिम्फ नोड्ससह फुफ्फुसांमध्ये हा कर्करोग पसरल्याचे दिसून येतो.
याबाबत अधिक माहिती देताना मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रविकुमार वाटेगावकर म्हणाले की, पॅसिव्ह स्माेकिंगमुळेही कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची दोन प्रकारे विभागणी करण्यात येते ‘स्मॉल सेल’ आणि ‘नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुसांचा कर्करोग. नॉन-स्मॉल सेल’ फुफ्फुस कर्करोगाचे चार मुख्य टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात कर्करोग फुफ्फुसात आढळतो; परंतु तो फुफ्फुसांच्या बाहेर पसरत नाही.
लंग कॅन्सर तज्ज्ञांच्या मते वजन घटणे, सतत थुंकी जमा होणे, कफ, खोकल्यातून रक्त पडणे ही फुफ्फुसाच्या कर्करोगाची काही मुख्य लक्षणे आहेत. फुफ्फुसांमधून कर्करोग एकदा पसरला की तो यकृतापर्यंत पोहोचून कावीळ होते आणि मूत्रपिंडाजवळील ग्रंथींमध्ये पसरून त्यांना निष्क्रिय करतो.
तसेच, धूम्रपान याबराेबरच तंबाखू खाणे, खैनी, हुक्का, तंबाखू असलेले पान, रिव्हर्स स्मोकिंग, घरातील किंवा ट्रॅफिकमधील प्रदूषित घटक हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागील मुख्य कारणे आहेत.