पुणे : जागतिक तंबाखू विराेध दिनानिमित्त पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामधील रुग्णांसाठी विशेष व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते. व्यसनाधीन लाेकांनी संवेदनशील हाेण्याची गरज असून त्यानंतरच ते व्यसनापासून मुक्त हाेऊ शकतील असा सल्ला डाॅ. राम गुडगिला यांनी रुग्णांना दिला. यावेळी मुक्तांगणचे शेकडाे रुग्ण उपस्थित हाेते.
डाॅ. अनिल अवचट आणि अनिता अवचट यांनी पुण्यात व्यसनमुक्ती केंद्राची 1986 साली स्थापना केली. यावेळी पु.ल. देशपांडे यांनी हे व्यसनमुक्ती केंद्र उभारण्यासाठी मदत केली हाेती. गेल्या अनेक वर्षांपासून मुक्तांगण देशभरातील व्यसनाधीन रुग्णांना बरे करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करते. रुग्णांसाठी नेहमीच येथे विविध कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात येते. आज जागतिक तंबाखू विराेधी दिनानिमित्त गुडगिला यांच्या व्याख्यानाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी गुडगिला यांनी अगदी साेप्या भाषेमध्ये रुग्णांना मार्गदर्शन केले.
गुडगिला म्हणाले, व्यसनमुक्त हाेण्यासाठी संवेदनशील हाेणे आवश्यक आहे. संवेदनशील झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक गाेष्टीकडे एका वेगळ्या दृष्टीकाेनातून बघाल. शरिराला जे फायदेशीर आहे त्याचेच सेवन करा. निसर्ग हा त्याच्या विराेधात गेल्यास शिक्षा देत असताे. तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे देखील निसर्गाच्या विराेधात आहे. त्यामुळे निसर्ग तुम्हाला याची शिक्षा देऊ शकताे. ताेंड हे तंबाखू ठेवण्याची जागा नाही. ताेंडातील दात, जीभ, हिरड्या, गाल, टाळू हे पचनक्रियेस मदत करत असतात. सततच्या तंबाखू सेवनाने यांचे कार्य बिघडते. लिव्हर ट्रान्सप्लान्ट हाेऊ शकते परंतु ताेंड ट्रान्सप्लान्ट हाेऊ शकत नाही. ताेंड हे शरीर स्वास्थाचा आरसा आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकून आपण निसर्ग नियमांचे उल्लंघन करत असताे.