पुणे : सामान्य लोकांना ‘चित्र’ दिसतं. पण ज्यांना दृष्टीचं नाही, त्याचं काय? त्यांची आस्वादक नजर नियतीनं जरी हिरावून घेतली असली, तरी एका पुण्यातील चित्रकारानं चित्रांवर ब्रेल लिपीत लिहिलेला आशय आणि ‘हेडफोन’ लावल्यावर बोलणारी व्यक्तिरेखा अशा सुंदर अनुभूतीतून दृष्टिहीनांसाठी चित्रामागची सौंदर्यदृष्टी ‘डोळस’ केली आहे. त्यामुळं दृष्टिहीन व्यक्तींशी ही चित्रं चक्क बोलू शकतात. चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी ही ‘नजरे’ची किमया प्रत्यक्षात साकारली.
अभिनव कला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेतलेल्या चिंतामणी हसबनीस यांची कलेमागील कहाणी देखील काहीशी ‘हटके’ आहे. आपल्या कलेचा उपयोग जोपर्यंत समाजाला होत नाही, तोवर चित्रप्रदर्शन भरवायचं नाही आणि स्पर्धेतही चित्र पाठवायचं नाही, असा पणच त्यांनी केला होता. त्यांच्या कलेचा फायदा समाजाला करून देण्यास तब्बल २५ वर्षांचा कालावधी उलटला. या ‘व्हिज्युअल आर्ट’चा प्रवास चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी कथन केला. ते म्हणाले, एकदा कर्वे रस्त्याला सिग्नलला उभा होतो. तेव्हा एक मुलगी अत्यंत आत्मविश्वासानं एकेक रस्ता क्रॉस करीत होती. शेवटचा रस्ता ओलांडताना तिनं पांढरी काठी बाहेर काढली. तेव्हा कळलं की ती दृष्टीहीन आहे. माझा मित्र पटकन म्हणाला, ‘तू इतकी छान चित्र काढतोस हिला चित्र दाखवू शकशील का?’ मी तो प्रश्न हसण्यावारी नेला; पण मला झोप आली नाही. चित्रकार म्हणून आपलं अस्तित्व काय असतं? आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असे प्रश्न मला पडले. मग हे आव्हानं पेलायचं ठरवलं; पण ही चित्र काढायची तर ब्रेल यायला हवं ते शिकलो.