धायरी:पोलिसांच्या हातात असलेले पत्र अन् लेखणी, कुणी आईबाबांना, तर कुणी आजी-आजोबांना पत्र लिहिण्यात दंग, स्मित हास्य करत त्यांच्या हातून पिवळ्या जाड कार्डावर लेखणी उमटत होती. 'पोस्टमन काका, पत्र घ्या...' म्हणत, त्या लेखणीतून उमटलेल्या शब्दांचे अर्थ मनातील भावानांना वाट करून देत होते. निमित्त होते 'जागतिक टपाल दिनाचे'. डाकिया डाक लाया, खुशी का संदेश लाया"हे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेले डाकिया चित्रपटातील गाणे म्हणत पोलिसांनी पोस्टातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
९ ऑक्टोंबर रोजी जागतिक पोस्टमन दिन असल्याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी हिंगणे खुर्द येथील पोस्ट ऑफिसला भेट देऊन आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जाऊन पोस्टातील अधिकारी व पोस्टमन यांचा सत्कार केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप केली. जागतिक पोस्ट दिनाची आठवण ठेवून पोलीस दलाकडून पोस्ट विभागाचा अशा अनोख्या पद्धतीने झालेला सन्मान पाहून सर्व पोस्ट विभागातील अधिकारी व पोस्टमन भारावरून गेले. या सुखःद अनुभवाबद्दल त्यांनी पोलिसांचे आभारही मानले.
प्रत्येकाच्या घरी पत्र वाटत फिरणारे खाकी कपड्यातील पोस्टमन काळाच्या ओघात कुठे तरी हरवल्याची जाणीव होत आहे. मात्र तरीही आजमितीसही हे पोस्टमन दररोज शहरातल्या गल्लोगल्ली चढ-उतार करून पत्र पोहोचवण्यासाठी पोस्टमनला दूरपर्यंत सायकलचीही रपेट मारावी लागते. त्यामुळे जागतिक टपाल दिनानिमित्ताने व्हॉट्सअॅपच्या जमान्यातही पोस्टाची विश्वासार्हता याच त्यांच्या शिलेदारांमुळे टिकून असल्याची प्रचिती येते. इंटरनेटच्या काळातही आजही लोक टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावर विश्वास कायम आहे.
- देविदास घेवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सिंहगड रस्ता पोलीस ठाणे