पुणे : मामाचं पत्र हरवलं...ते मला सापडलं हा खेळ अात्ताच्या व्हाॅट्सअॅपवरील तरुणाईला क्वचितच अाठवत असेल. मनातील भावना शब्दात मांडून ते पत्र अापल्या व्यक्तीपर्यंत पाठवून त्याचे उत्तर येईपर्यंत मनाला लागणारी हुरहुर अाताच्या लास्ट सिनमध्ये येणार नाही. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी पत्राचं, टापालाचं प्रत्येकाच्या मनात वेगळं स्थान अाहे. पत्र वाचून ज्या भावना मनात प्रकट हाेतात त्या मेसेज वाचून कदाचित हाेणार नाहीत. तंत्रज्ञान जसजसं प्रगत हाेत गेलं टपाल तसतसं मागे पडत गेलं. अापल्यातील प्रत्येकाला अापण शेवटचं पत्र केव्हा अाणि काेणाला लिहीले अाहे, हे अाठवत ही नसेल. विविध कलेतून संदेश अापल्यापर्यंत पाेहचवणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या अायुष्यात शेवटचं पत्र केव्हा लिहीलं हे अाम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
अमेय वाघ अाणि पत्राचं एक वेगळंच नातं अाहे. त्यानी लिहीलेल्या पत्रांची कहाणी भन्नाट अाहे. नववीत असताना एका अांतरशाेलेय स्पर्धेत एका मुलीशी त्याची अाेळख झाली हाेती. त्यानंतर ती त्याची चांगली मैत्रिण झाली. पुढे अनेक वर्ष त्यांचा पत्र व्यवहार सुरु हाेता. अमेय म्हणताे या पत्रव्यवहारातून अामची निखळ मैत्री अाणखिनच वृद्धिंगत झाली. तीलाच कदाचित शेवटचे पत्र लिहीले असेल. नवीन तंत्रज्ञान अापण अात्मसात करायलाच हवे परंतु लिहिलेल्या पत्रांची वेगळीच गम्मत हाेती. कुठल्याही गाेष्टीच्या हार्ड काॅपीचे अापल्या अायुष्यात महत्व असते. पत्र हे स्वतःच्या हाताने लिहीलेले असल्याने शब्दांमध्ये लिहीणाऱ्याच्या भावना उतरलेल्या असतात. मी अनेक जुनी पत्र अजूनही जपून ठेवलेली अाहेत.
पत्रांमुळे अक्षय टंकसाळे अाणि त्याच्या अाजीचं नातं अधिकच घट्ट झालं. लहाणपणी अक्षय अाजीकडे गेल्यानंतर त्याची अाजी तीला अालेली पत्रे अक्षयकडून वाचून घेत असत. त्याचबराेबर काही पत्रांना अक्षयकडून उत्तर लिहून घेत असत. अक्षयला ही पत्रे वाचायला तसेच पत्रांना उत्तर द्यायला खूप मजा यायची. ती मजा व्हाॅट्सअॅप मेसेजिंग मध्ये नसल्याचे ताे सांगताे. तसेच इतकी वर्ष उन्हातान्हात घराेघरी पत्र घेऊन जाणारे पाेस्टमन अजूनही सायकल वापरतात याचे त्याला दुःख हाेते. त्यांना शासनाने दुचाकी द्यावी अशी त्याची मागणी अाहे.
टपाल ही अाता दुर्मिळ हाेत चाललेली गाेष्ट अाहे, याचं सावनी रविंंद्रला वाईट वाटतं. काेणाच्या तरी पत्राची वाट बघण्यात एक वेगळीच उत्सुकता हाेती असं तीला वाटतं. लहानपणी पत्रातून सावनी अाजी-अाजाेबांशी संवाद साधायची. सावनी म्हणते, माझं बालपण चिंचवडमध्ये गेलं. माझं अाजाेळ काेकणात असल्याने लहानपणी अाजी-अाजाेबा मला पत्र पाठवायचे. त्यांच्या पत्रांची मी नेहमी वाट पाहायचे. अामच्या काेकणातील दापाेलीच्या घरातच छाेटसं पाेस्ट अाॅफिस हाेतं. त्यामुळे पूर्वी अनेक लाेक अामचं पत्र अाला का याची विचारणा करण्यासाठी येत असतं. पूर्वी भावनांना अधिक महत्व हाेतं. पत्र हे त्याचं मुख्य कारण हाेतं. हे सगळं अनुभवायाला मिळत नाही याची कुठेतरी खंत वाटते. मी पाेस्टाने केलेला शेवटचा व्यवहार म्हणजे लहानपणी मी राखी पाेस्टाने माझ्या भावंडांना पाठवली हाेती.