- कांताराम भवारी
डिंभे (पुणे) : एकेकाळी पोटामध्ये असंख्य गुपितांचा खजिना भरून प्रत्येकाच्या सुख-दुःखाची साक्षीदार असणाऱ्या गावागावातील टपालपेट्या आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे जग झपाट्याने गतिमान होत आहे. पत्रांची जागा मेल, मेसेजेस, ऑनलाइन पोस्टलने घेतली आहे. मात्र, पत्रात हाताने लिहिलेल्या भावभावनांची सर त्याला कधीच येणार नाही. एकेकाळी प्रत्येकाची सुख-दुःखे भावनांच्या साक्षीदारच असणाऱ्या व उभं आयुष्य असंख्य गुपिते आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या टपालपेट्या मात्र आता इतिहासजमा होऊ लागल्या असल्या तरी जगभरातील टपाल सेवा बदलत्या काळाबरोबर अपडेट होत आहे.
दरवर्षी ९ ऑक्टोबर हा दिवस टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक टपाल दिन किंवा ''वर्ल्ड पोस्ट डे'' हा जगभरातून साजरा केला जात आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वांत सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरूक करणे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश होय.
एक काळ असा होता की पत्रांनी पेटी भरून जायची. सणांची सुरुवातही पत्रांनीच सुरू व्हायची. रेशीम धाग्यामधील बहिणीने भावासाठी खरेदी केलेली राखी असेल, संक्रांतीमध्ये पाठवलेले तीळगूळ असतील, दसरा-दिवाळीच्या शुभेच्छा असतील, लपवत लपवत गुलाबी पत्र घेऊन येत असलेली प्रेयसी असेल किंवा जवानांसाठी तिच्या पत्नीने लिहिलेले पत्र असेल, कोणत्या तरी बँकेची नोटीस घेऊन आलेला कारकून असेल, जवानांसाठी आलेली तार असेल किंवा वडिलांना आईने लिहिलेले पत्र टाकायला आलेला मुलगा असेल अशी कितीतरी पत्रे पेटीत पडायची.
सध्या बदलत्या इंटरनेटच्या काळात जगभरात असणाऱ्या गावागावातील टपाल पेट्या अडगळीत पडू लागल्या असून, ब्रिटिशांच्या काळापासून जनतेशी असणारं त्यांचं नातं तुटू लागलं आहे. आता पेटीत पत्र पडत नाहीत. पोस्टमनही पहिल्यासारखा दररोज येत नाही. असे असले तरीही ग्रामीण भागात आजही टपाल सेवा उत्तम कार्य करत आहे.
जगभरातील टपाल सेवा होतेय अपडेट -
बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. डाक, पार्सल, पत्र हे एक्स्प्रेसने जाण्याची सेवा सुरू झाली आणि सर्वच स्तरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाइन पोस्टल देवाण-घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे. ''यूपीयूने केलेल्या एका सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला ५५ पेक्षा जास्त प्रकारच्या ई-पोस्टल सेवा उपलब्ध आहेत.