पुणे : स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी सुमारे दोन हजार अधिक महिलांनी एकत्रित येत रविवारी दोन विश्वविक्रमांना गवसणी घातली. स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि सलग सहा मिनिटे स्तनाच्या कर्करोगाचे प्रतीकअसलेल्या गुलाबी रंगाचे नेलपॉलिश बोटांना लावण्याचा विश्वविक्रम या महिलांनी केला.ओवायई (ओपन युअर आईज) फाऊंडेशनतर्फे येरवडा येथील डेक्कन महाविद्यालयाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यामध्ये १९५६ महिलांनी नेलपॉलिश लावून, तर १९१९ महिलांनी ब्रेस्ट कँसरवरील मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निरीक्षण अधिकारी लुसिया सिनीगॅग्लियसी यांनी या दोन्हीही विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र ओवायई फाऊंडेशनच्या पदाधिकाºयांकडे सुपूर्त केले. याप्रसंगी प्रशांती कॅन्सर सेंटरच्या लालेह बुशेरी, फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सिमरन जेठवानी, आंतरराष्ट्रीय संचालिका लीला पुनावाला, उपाध्यक्षा जानकी मल्होत्रा, सचिव रेश्मा सराफ, सहसचिव लतिका साकला, खजिनदार श्वेता पाटील, सपना छाजेड, स्तन कर्करोगतज्ज्ञ डॉ. चैतन्यानंद कोप्पीकर आदी उपस्थित होते. कर्करोगातून बºया झालेल्या पाच महिलांचे अनुभव ऐकताना अनेकींचे चेहरे भावुक झाले. लुसिया सिनीगॅग्लियसी म्हणाल्या, की जवळपास दोन हजार महिलांनी एकाच वेळी ब्रेस्ट कॅन्सरविषयी जाणून घेत जागृती केली. असा उपक्रम जगभरात पहिल्यांदाच झाला आहे. भारतीयांनी आणि त्यातही पुणेकरांनी हा विक्रम घडवून आणला. कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये सुरेश जेठवानी, भरत चव्हाण पाटील, आनंद छाजेड, रविराज साकला, विनोद रोहानी यांनी मेहनत घेतली.स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती होतानाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन विश्वविक्रम झाले आहेत. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि छोट्या छोट्या गटातून महिला यामध्ये सहभागी झाल्या. दोन हजारपेक्षा अधिक महिलांनी यात सहभाग घेतला.- सिमरन जेठवानी, ओवायई फाउंडेशन
कर्करोग जनजागृतीचा विश्वविक्रम, दोन हजार महिलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:47 AM