लक्ष्मण मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : गेल्या काही वर्षा$ंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, वारीचे महत्त्व तरुणांना पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आम्ही सुरू केलेल्या ‘फेसबुक दिंडी’ला खूपच चांगला प्रतिसाद लाभला आहे. पालखी सोहळा ‘हायटेक’ करण्यावर आम्ही भर दिला असून, ‘गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये वारीची नोंद करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अभिषेक मोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.पालखी सोहळा प्रमुख अभिषेक मोरे आणि श्रीक्षेत्र देहू संस्थानचे प्रमुख बाळासाहेब मोरे यांच्याशी ‘लोकमत’ने पालखी सोहळ्यादरम्यान संवाद साधला. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढते आहे. खरेतर भक्तिमार्गावर तरुण येत आहेत, हे सुचिन्ह आहे. मागील पाच वर्षांपासून मी या सोहळ्यात सेवा बजावतो आहे. सोहळाप्रमुख म्हणून सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आम्ही तरुणांना आणि उच्चशिक्षितांना वारीकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा देशासह संपूर्ण जगामध्ये आम्ही पोहोचवित आहोत. वारीमध्ये सहभागी होणारा तरुणवर्ग आमच्याकडे कोणत्या आशेने पाहतोय याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही त्यांच्या अशा कशाप्रकारे पूर्ण करू शकू याचा गांभिर्याने विचार करतो आहोत. त्यांचा सहभाग कशा प्रकारे वाढेल याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तरुण मुले जर वारीमध्ये सहभागी झाली, तर त्यांची आध्यात्मिक प्रगती आपोआप होणार आहे. संत साहित्याचा अभ्यास केला तर त्यांची पाऊले गैरमार्गाकडे वळणार नाहीत. त्यांना वारकरी संप्रदायाचे सांप्रदायिक वळण लागेल. कुटुंबातील लोकांना भक्तिमार्गाची जाणीव होईल. यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचणार आहेत. यंदाच्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यामध्ये ३३१ दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोहळ्याचे हे ३३२ वे वर्ष आहे. हा योगायोग आहे. यंदाच्या पालखी सोहळ्यात साडेतीन लाख वारकरी आतापर्यंत सहभागी झाले आहेत. पाऊस आणि पेरण्या नसल्याने यंदाच्या वर्षी वारकऱ्यांची संख्या कमी आहे. या पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रामधून वारकरी सहभागी होत असतात. मराठवाडा, विदर्भातील वारकरीही सहभागी होतात. अनेक दिंडीप्रमुखांनी पाऊस आणि पेरण्या नसल्यामुळे अडचण असल्याचे कळविले आहे. आम्ही शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, लवकर पाऊस पडावा आणि पेरण्या उरकून शेतकऱ्यांनी वारीमध्ये सहभागी व्हावी, अशी पांडुरंगाला विनंती करीत असल्याचे मोरे यांनी सांगितले.
पालखी सोहळ्याचे व्हावे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’
By admin | Published: June 19, 2017 5:14 AM