मोरगाव: तरडोली (ता. बारामती) येथील संगीता हनुमंतराव भापकर यांना कृषी पर्यटन विकास संस्था व जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार निवड समिती यांच्या वतीने दिला जाणारा 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवाॅर्ड-२०२१' नुकताच प्राप्त झाला आहे.
चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त 'कृषी पर्यटनाव्दारे महिला शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेचा विकास' हे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. या अनुषंगाने जागतिक कृषी पर्यटन निवड समितीने 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवाॅर्ड-२०२१' हा पुरस्कार वेगवेगळ्या देशातील कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अकरा महिलांना जाहीर केला होता. नुकतीच १५ व १६ मे रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळ, पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने दोन दिवस ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेत भापकर यांना ऑनलाईन पध्दतीने सदरचा पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर, राज्य पर्यटन विकास महांडळाचे संचालक आशुतोष सलील, डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे आदी उपस्थित होते. आफ्रिका, रवांडा, स्पेन, इडली, फ्रान्स, फिलीपाईन्स अशा विविध देशातील महिलांना यानिमित्त गौरविण्यात आले. भारतातून संगीता भापकर यांच्यासह डॉ. अश्विनी कोळेकर, नंदा कासार, नंदा नरोटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
२००५२०२१ बारामती—१०