प्रिय मैत्रीण,
तशी आपली ओळख पिढ्यांपिढ्यांची...तुझी आई, आज्जी, पणजी अगदी खापर खापर खापर पणजीही माझी मैत्रीण. या साऱ्यांशी मैत्री करून आज मी पुन्हा तुझ्याकडे मैत्रीचा हात पुढे करत आहे. खरं सांगू त्या साऱ्या जणी कळत-नकळत आणि इच्छा असो किंवा नसो पण माझ्याशी जोडल्या गेल्या. पर्यायच नव्हता त्यांच्याकडे पण तू मात्र वेगळीच ! २१व्या शतकातली स्वतंत्र वगैरे म्हणतात ना अशी. तुझ्याशी मी स्वतःहून मैत्री करतीये कारण यापुढे माझं अस्तित्व तुझ्यावर अवलंबून आले. पूर्वी मासिक पाळी आली की माझ्याशी कायमस्वरूपी जोडलं जाणं आता कमी झालंय. आता तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे तुम्ही अनेकदा मला नाकारता. सध्याची तुमची धावपळ आणि कसरत बघितली की तुमची अडचण मी समजू शकते. पण म्हणून मी जुनाट झालीये असं नाही ना गं होत ! मी जशी पूर्वी पैठणी, इरकल, नारायणपेठी, रेशीम, बनारस,चंदेरी, पटोला, गाढवाला अशा रूपात वावरायची तीच मी आता तुमच्यासाठी लिनन,कॉटन, सेमी कॉटन किंवा अगदी हवी तशी असते. पण मैत्रिणी तू मात्र मला पूर्वीसारखं मिरवत नाही. वर्षानुवर्षे कपाटात तुमच्या आई, आज्जी, सासूबाई अशा अनेकांच्या प्रेमाचा, स्पर्शाचा सुगंध मी बसलीये अगदी एखाद्या अत्तरासारखी. पण सखी अत्तर जसं उडत तशी मलाही कालमर्यादा आहेच की गं ! मी विरल्यावर, फाटल्यावर दुःख करून घेण्यापेक्षा जमेल तेव्हा मला बाहेर काढा. तुम्ही प्रेमाने माझ्याकडे फक्त एक कटाक्ष टाका आणि बघा मी तुमचं रूप कसं खुलवते ते !
तू अगदी माझ्यापासून टॉप, पर्स, मोबाईल कव्हर अगदी वनपीससुद्धा शिवायला माझी हरकत नाही पण निदान ते रूप बदलण्याआधी मला एकदा मूळ रूपात बघ तरी. आज्जी म्हणून मायेने फिरणारा, आई म्हणून छकुल्याचं तोंड पुसणारा, बायको म्हणून लडिवाळ चाळा करणारा माझा पदर तुझ्या आत्मविश्वास घेऊन वावरणाऱ्या खांद्यावर मिरव आणि बघ तुझीच जादू. मला खात्री आहे माझ्या सांगण्याचा तू नक्की विचार करशील. आज माझा दिवस की काय म्ह्णून सगळीकडे माझ्याबद्दल बोललं जात आहे. त्यामुळे म्हटलं आपणही या निमित्ताने तुझ्यापाशी मोकळं व्हावं इतकंच. बाकी तुझ्या प्रगतीमुळे होणारा आनंद शब्दात न मावणाराच आहे.अशीच कायम पुढे जा याच शुभेच्छा !
तुझ्यासाठी कायम बदलाला तयार असणारी तुझी मैत्रीण, साडी.