- नितीन गायकवाड
एरंडवणे (पुणे) :शिक्षणासाठी नसतं वयाच बंधन, जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर वयच काय पण हरेक स्थितीवर मात करून अगदी पीएच.डी.पर्यंतचे शिक्षणही संपादन करता येते. याचंच प्रत्यंतर घडवून दिलंय मंदाकिनी सुधाकर पानसरे या अवघ्या ८५ वर्षीय तरुणीनं. आयुष्याच्या संध्याकाळी केवळ जिद्दीच्या जोरावर १५ वर्षे योग विषयावर संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नुकतीच पीएच.डी. मिळविली आहे.
डॉ. योगेश पवार (शारीरिक शिक्षण संचालक, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय) यांच्या मार्गदर्शनाखाली ‘योगाच्या इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर संशोधन केले. या दरम्यान दोनदा कोरोना होऊन न्यूमोनिया झाला, तरी त्यांनी जिद्द न सोडता अभ्यासक्रम पूर्ण केला, यातून भरपूर समाधान मिळाल्याचे त्या सांगतात.
भारतात अनेक ठिकाणी भेटी देऊन संदर्भ काढले. दोन वेळा परदेशी जाऊन योगाचे संदर्भ शोधले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन ग्रंथालय, पुणे विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे ग्रंथालय, तसेच बडोद्याचे सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या ग्रंथालयात वाचन करून, विविध ठिकाणी भेटी देऊन संदर्भसाहित्य गोळा केले. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत योगाचे वेगवेगळे प्रकार, त्यात होत गेलेले बदल आणि त्याचा प्रसार कसा झाला, योगाचे काही प्रकार हिंदू, बौद्ध आणि जैन या धर्मांत दिसून येतात, हे या प्रबंधात मांडले आहे. त्यांच्या मैत्रिणी श्रद्धा नाईक, शुभदा जोशी, तसेच संस्कृत विषयासाठी ज्योती लिमये यांच्या मदतीतून त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
गुरू-शिष्याची जोडी....
विद्यार्थी ज्या गुरूच्या हाताखाली शिकला त्याच गुरूने त्याच विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळविली याचे दुर्मीळ उदाहरण म्हणजे डॉ. मंदाकिनी पानसरे व डॉ. योगेश पवार. डॉ. पानसरे या बी. जे. मेडिकल महाविद्यालय येथे प्राध्यापक होत्या. नंतर आगाशे महाविद्यालयात अध्यापन केले. त्यावेळी योगेश पवार हे त्यांचे विद्यार्थी होते. एमबीबीएस, एमडी असलेल्या पानसरे या भारती विद्यापीठातून निवृत्त झाल्या.
‘मी दररोज पाण्यामध्ये तासभर चालते, योगासन, प्राणायामही करते. तरुणपणापासून नियमित योग केल्यामुळे या वयातही माझी तब्येत चांगली आहे. नव्या पिढीच्या संसारात फारशी ढवळाढवळ न करता आनंदाने राहते. नियमित व्यायाम आणि मित्र-मैत्रिणींना नेहमी भेटते, त्यासारखा दुसरा आनंद नाही. शक्यतो दुसऱ्यांना त्रास होईल असे वागले नाही तर वृद्धावस्थाही आनंदी होते.
- डॉ. मंदाकिनी पानसरे, याेग अभ्यासिका