कोरोना महामारीचा फटका जगातील सर्वच देशांना बसला आहे. अनेकांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. अशा अवस्थेतही मोठ्या प्रमाणात प्रगत देशांसह विकसनशील देशांनी आपली लष्करी क्षमता विकसित करण्यावर गेल्या दोन वर्षांत भर दिला आहे. कोरोनाचा उगम चीनमधून झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत होते. आता नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही चीनवर लक्ष साधत त्यांच्या गुप्तचर संस्थांना ९० दिवसांत याचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापर युद्ध तर आहेच, तसेच दक्षिण चीन समुद्र आणि तैवान प्रश्नावरून सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यात गेल्या वर्षापासून चीनने भारताशी सीमावाद उकरून लडाख परिसरात मोठ्या प्रमाणात सैन्य जमवले आहे. दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती आजही आहे. चीनने त्यांची अत्याधुनिक शस्त्रे सीमेवर तैनात केली आहे. भारतानेही चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर सैन्यव्यवस्था मजबूत केली आहे. दोन्ही देशांत सध्या चर्चा सुरू असली, तरी तणाव निवळला नाही. दुसरीकडे आखाती देशात इस्राईल-पॅलेस्टाईनवरून संघर्ष सुरू आहे. इराणही अण्वस्त्र सज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकत्याच झालेल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही चीनला लक्ष करण्यात आले. याला चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. रशियातील ब्लादमिर पुतीन यांचे विरोधक असलेले ॲलेक्सी नवेलनी आणि युक्रेन प्रश्नावरून अमेरिका आणि रशिया यांचा तणाव आहे. पुतीन आणि बायडेन यांची जिन्हेवा येथे बैठक झाली. यावर विस्तृत चर्चा झाली असली, तरी प्रत्येक मुद्यावर तोडगा निघाला असे आजही म्हणता येणार नाही. चीनला शह देण्यासाठी भारत, जपान, अमेरीका आणि ऑस्ट्रेलिया यांनी क्वाड समूहाची स्थापना केली. यामुळेही तणावाचे वातावरण आहे. जगात असलेली शीतयुद्धासारखी परिस्थिती मोठ्या संघर्षाचे रूप धारण करू शकते. हा संघर्ष अण्वस्त्र वापरापर्यंत जाण्याचीही शक्यता असल्याने संपूर्ण पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका सोव्हिएत रशिया यांच्यातील संघर्ष हा आण्विक युद्धापर्यंत येऊन ठेपला होता. मात्र, आण्विक प्ररोधनामुळे (न्यूक्लिअर डिटरन्स) यामुळे दोघांनीही एकमेकांवर हल्ला करण्याचे टाळले. सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर हा संघर्ष कमी झाला. मात्र, आज चीन आणि रशिया यांच्यात नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे. आज ईंटरनॅशनल कॅम्पेन टू ॲबॉलिश न्यूक्लिअर वेपन्स (आयसीएएन) ही संस्था अण्वस्त्र कपात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करीत आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना हवे तसे यश मिळाले नाही. पूर्वीच्या तुलनेत आज तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहे. यामुळे लष्करी तंत्रज्ञानही मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात डागता येईल अशा शस्त्रांस्त्रांची निर्मिती झाली आहे. समुद्राखाली, समुद्र व अवकाश व जमीन आणि आकाश, अशा ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली जातील, असे तंत्रज्ञान भारतासह विकसित देशांनी विकसित केलेले आहे़ अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांपैकी एकाही राष्ट्राने आततायीपणा केला, तर त्याचा परिणाम सर्व मानवी समूहाला सोसावा लागणार आहे़ हिरोशिमा व नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्बचे परिणाम अजूनही तेथील नव्या पिढीला सोसावे लागत आहेत़ त्यामुळे या विषयावर जागतिक समूहाने सुरक्षेच्या चौकटीत विचार करणे आज गरजेचे आहे.