पुणे :'गेली दहा वर्ष आम्ही मैत्रिणी योगासने करण्यासाठी एकत्र भेटत आहोत. पण आता फक्त योगाचा नव्हे तर सामाजिक कार्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. त्यामुळे आता फक्त स्वतःच्या आरोग्यासाठीच नव्हे तर समाजासाठीही काम करण्याची सवय लागली आहे'. मीपासून आम्ही पर्यंतचा प्रवास पूर्ण करणाऱ्या कोथरूड भागातल्या फिटनेस फ्रीक ग्रुपची ही गोष्ट.
कोथरूड भागातील अजंठा अव्हेन्यू सोसायटीत राहणाऱ्या या महिला मागील दहा वर्षांपेक्षाही अधिक काळ योगासने करण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र आता त्यासोबत त्या सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी झाल्या आहेत.
या ग्रुपमध्ये वैशाली नाफडे यांच्यासह मंजिरी वैद्य, राधिका फडके, स्वाती शेंबवणेकर, नीता पटेल, आरती लाटकर, साधना दराडे, प्राजक्ता पंडीत, शबनम चावक अशा नऊ जणी नियमित सहभागी होतात.केवळ योगासनेच नाहीत तर त्यासोबत बॅलन्स योगा, पार्टनर योगा असे काही वेगवेगळे प्रकारही त्या करतात. योगा केवळ शरीरासाठीच नाही दैनंदिन कामांची सुसूत्रता राखण्यासाठीही महत्वाचा असल्याचा या महिलांचा अनुभव आहे.
याबाबत नाफडे म्हणाल्या, 'योगासने एकाच पद्धतीने करण्यापेक्षा त्यातही नावीन्य आणायचा आमचा प्रयत्न असतो. खऱ्या अर्थाने आम्ही ते एन्जॉय करतो. लाटकर म्हणाल्या की. 'आम्ही ग्रुपच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सद्भावना निधी म्हणून मदत केली. उडीशा येथे झालेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या नागरिकांना वैद्यकीय साहित्य पाठवले. शिवाय व्यक्ती म्हणून दिवसभर उत्साह टिकून राहणे आणि शारीरिक तक्रारी कमी होण्याकरिता योगाची मोठी मदत होते असे चावल यांनी सांगितले.
वाढदिवस नाही, आरोग्य जपतो
आमच्या ग्रुपमध्ये वाढदिवसाची पार्टी देण्याची पद्धत नाही. एकत्र येऊन शरीरासाठी हानीकारक कृती करण्यापेक्षा आम्ही शब्दशः आरोग्याची जपणूक करण्याचा प्रयत्न करतो असे डॉ फडके यांनी सांगितले.