बारामती (पुणे) : येथील श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरमध्ये स्वातंत्र्यदिनी उद्या, सोमवारी (दि. १५) आगळावेगळा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. हा जगातीच पहिलाच ड्रॉ असल्याचा दावा संयोजकांनी केला आहे. सेंटरतर्फे १०१ जोडप्यांना मोफत आयव्हीएफ उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी नोंदणी केलेल्या जोडप्यांची नावे स्वातंत्र्यदिनी जाहीर होतील, अशी माहिती सेंटरचे प्रमुख डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांनी दिली.
‘तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ‘ हे ब्रीद घेऊन श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती गेली सात वर्षे आयव्हीएफच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या आयुष्यात मातृत्व स्वप्नपूर्ती साकारत आहे. टेस्ट ट्यूब बेबी उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर हा खर्च आहे. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार आणि पवार यांच्याच वाढदिवसानिमित्त श्री चैतन्य मातृत्व योजना २०२२ सुरू केली. या योजनेअंतर्गत १०१ जोडप्यांसाठी सुमारे ८० लाख रुपयांचा येणारा खर्च श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर स्वत: रुग्णांसाठी उचलणार आहे. या सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या सुमारे ४००० हून अधिक रुग्णांच्या आयुष्यात गेल्या आठ वर्षांत टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून यश आलेले आहे. त्यांचे मातृत्वाचे स्वप्न साकारले आहे.
आर. आय. विटनेस प्रणाली, ब्लास्टोसिस ट्रान्स्फर, लेझर हॅचिंग यांसारख्या जागतिक दर्जाच्या आयव्हीएफमधील सुविधा देणारे पश्चिम महाराष्ट्रातील हे एक अग्रगण्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर ठरले आहे. यावर्षीदेखील आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ७५ भाग्यवान जोडप्यांचा आयव्हीएफ मोफत करण्याचा संकल्प श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरने केला आहे.
वंध्यत्व निवारणासाठी नेमके काय करायला हवे...
याबाबत काही शास्त्रीय तपासण्या कराव्या लागतात. महिला व पुरुषांसाठी त्या स्वतंत्र असतात. कोणी काहीही सांगितले तरी जोपर्यंत अचूक तपासणी होऊन नेमके निदान होत नाही, तोवर काहीही सांगणे योग्य नसते. महिलांमध्ये गर्भनलिका तपासणी, हार्मोन्सची तपासणी गरजेची असते, तर पुरुषांमध्ये वीर्याची तपासणी करावी लागते. अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने मनामध्ये संकोच किंवा भीती न बाळगता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या करून घ्याव्यात.
टेस्टट्यूब बेबी कोणाला उपयुक्त ठरते-
अनेकदा वाट बघूनही अपत्यप्राप्ती होत नाही. वय वाढून जाते. अशा वेळेस महिलेचे वय जास्त असणे, गर्भनलिका बंद असणे, स्त्री बिजाची पुरेशी वाढ न होणे किंवा स्त्रीबिजाची कमतरताच असणे, गर्भाशयात गाठी असणे, वारंवार गर्भपात होणे अशा समस्यांमुळे महिलांमध्ये नैराश्य येते. मात्र, अचूक निदान व तपासणी झाल्यानंतर टेस्ट ट्यूब बेबी हे अशा जोडप्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदानच ठरू शकते. नैराश्य झटकून स्त्रियांनी याचा विचार करायला हरकत नाही.