पुणे: कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी यासंबंधित ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये जिवंत अळी चॉकलेटमध्ये रेंगाळताना दिसत आहे. यासंबंधित कंपनीकडे तक्रार केली असता कंपनीने, ‘पुढच्या वेळेस अशी घटना घडल्यास आमच्या पत्त्यावर ती कॅडबरी पाठवा’ असे उत्तर दिले आहे.
प्रसिद्ध चॉकलेट कंपनी ‘कॅडबरी डेअरी मिल्क’च्या चॉकलेटमध्ये याआधीही अळी सापडल्याचे प्रकार घडले आहेत. पुण्यामध्ये पुन्हा कॅटबरीत अळी सापडल्याने ग्राहकांनी सोशल मीडियावर रोष व्यक्त केला आहे. अक्षय जैन यांनी ‘कॅडबरी टेंप्टेशन्स रम आणि मनुका प्रीमियम चॉकलेट बार’ ही कॅडबरी मागवली होती. त्यांनी ती खाण्यासाठी रॅपर उघडले असता त्यामध्ये दोन अळ्या दिसल्या. त्यानंतर अक्षय जैन यांनी त्याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ कंपनीला पाठवत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावर कॅडबरीने प्रतिक्रिया देताना म्हटले की,‘आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनांमध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असे काही आढळल्यास, आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले पदार्थ पाठवण्यास विसरू नका. आम्ही याबाबत योग्य तपास करून तुमच्या समस्येचे निराकरण करू.’ कंपनीच्या या उत्तरावर अक्षय जैन यांनी नाराजी व्यक्त करत,‘कॅडबरी चॉकलेटची गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक धक्कादायक घटना आहे.’ असे मत व्यक्त केले आहे.
यानिमित्ताने पुन्हा एकदा खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि एक्स्पायरी डेटचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनांवर तसेच त्यांच्या एक्स्पायरी दिनांक यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
याआधीही अनेक प्रकरणांमध्ये सापडली होती अळी
अक्षय जैन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅडबरी चॉकलेटमध्ये अळी आढळल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू असताना, आणखी अभिनंदन रिसबूड या व्यक्तीने चॉकलेटचा फोटो शेअर करत त्याच्याकडच्या चॉकलेटमध्येही अळी सापडल्याचे सांगितले आहे. यासोबतच अनेकांनी अशा घटना यांच्याबाबतही घडल्याची नोंद केली आहे.