राज्य मंडळाच्या यंदाच्या दहावीच्या निकालाने या वर्षी अनेक विश्वविक्रम केले आहेत. या घवघवीत यशाचा ना विद्यार्थ्यांना सात्त्विक आनंद आहे, ना पालकांना समाधान. विद्यार्थी शाळेत प्रवेशित झालेल्या दिवसापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेवर डोळा ठेऊन अभ्यास करत असतात. ‘दहावी बोर्ड परीक्षा’ ही अत्यंत प्रतिष्ठित नामाभिधानाने गौरवांकित असलेली तसेच विद्यार्थ्यांची सचेतन प्रेरणा होती. आयुष्याच्या लखलखत्या तेजोमय विक्रमाचे ते प्रवेशद्वार असायचे. आयुष्य जगायला सक्षम करणाऱ्या क्षमतांचे पैलू पाडणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांमधील सर्व सुप्त क्षमता संवर्धित करणारा मापदंड आणि मानदंड होती.
ओलांडली गेलेली मर्यादा विकासाऐवजी विनाशाकडे घेऊन जाते. हजारो विद्यार्थ्यांना गुण प्राप्तीची शंभरी ओलांडली आहे. पूर्वी पालक आपल्या मुलांचे लक्षवेधी गुण मोठ्या अभिमानाने सांगत. परंतु, आता हे फुगलेले गुण एकमेकांना सांगण्याचा संकोच वाटतो आहे. मूल्य नसलेले हे मापन विद्यार्थी मनात अहंकार निर्माण करत आहे. परीक्षा परिश्रमाचा संस्कार करते. हा सिद्धांतच येथे खोटा ठरला आहे. या परीक्षेतून मिळालेल्या प्रचंड आभासी गुणांची नशा सर्वोत्तम भवितव्यासाठी घ्यावयाच्या झेपेचा नाश करणारी आहे.
आता या विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाच्या अविरत ध्यासाची वेगळ्याने अध्ययन अनुभूती द्यावी लागेल. अपयशातून सावरणे काय असते हे यांना कधीच कळणार नाही. पूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी एखादी दुसरी कॉपी केली तर तो चिंतेचा आणि चिंतनाचा विषय व्हायचा. परीक्षा न देता प्राप्त गुणांची ही लयलूट आळशी आणि अकर्मण्य शैक्षणिक संस्कृतीची पायाभरणी करणारी विनाशकारी प्रथा ठरू नये म्हणजे झाले.
शाळा, शिक्षक आणि पालकांपुढे या विद्यार्थ्यांवर आता अविरत श्रमाच्या कठोर परिश्रमाचे आत्मलक्षी संस्कार जाणीवपूर्वक करावे लागतील. प्राप्त झालेले हे भरमसाठ आभासी अंक मापन आहे, मूल्यमापन नाही. हे त्यांच्या मनावर ठसवावे लागेल. शाळांनी बारावीपर्यंत या विद्यार्थ्यांवर प्रत्यक्ष कृती अभ्यास आणि स्वाध्याय सोडून घेण्याचे सतत संस्कार करण्याची आवश्यकता आहे. ‘लक्ष्यतक पहुंचे बिना पथमे पथिक विश्राम कैसा’ या प्रेरक विचारांचे कृतीद्वारा संस्कार करणे अत्यावश्यक आहे. लक्ष्यवेधी अध्ययन अनुभव देऊन आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षक मित्रांना तयार रहावे लागेल. अन्यथा खेडोपाड्यातील वाडी-वस्त्यावरील विद्यार्थी दिशाहिन भरकटल्याशिवाय राहणार नाहीत. ही भीती अस्वस्थ करणारी आहे.
कोरोनाच्या विनाशकारी पडझडीतील ही शैक्षणिक पडझड नवपिढ्यांतील शौर्य, धैर्य, साहस आणी प्रज्ञा संवर्धनाला मारक ठरणारी असून ती अधिक चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे समाज आणि राष्ट्र बांधणीसाठी नवनिर्माणाच्या कृतिशील सर्जशीलतेची पुनर्रचना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सर्वांनाच तयार राहावे लागेल.
- डॉ. गोविंद नांदेडे, माजी प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य
फोटो - दहावी निकाल