पुणे : माणसाची कीर्ती मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो. त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत राहते. भारतीय परंपरेमध्ये विख्यात असलेल्या सप्तचिरंजीवांची संकल्पना हेच वास्तव अधोरेखित करते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.
श्री गंधर्ववेद प्रकाशन या संस्थेतर्फे ’सप्तचिरंजीव’ या ग्रंथमालेतील सात चिरंजीव व्यक्तिमत्वांच्या चरित्रांचे प्रकाशन देगलूरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदिक संशोधन मंडळाचे संचालक प्रणव गोखले तर प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे उपस्थित होते.
व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन धारणेसाठी उपकारक ठरणा-या गुणांचा परमोत्कर्ष आपल्या जीवनामध्ये साधण्याची प्रेरणा या चरित्रग्रंथांच्या माध्यमातून मिळेल असे देगलूरकर यांनी सांगितले. प्रणव गोखले म्हणाले की, प्राचीन काळी होऊ न गेलेल्या घटनांना शब्दालंकृत करून पूर्वकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा सेतू निर्माण करणे हे पुराणांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच पुराण साहित्यात शब्दबद्ध झालेल्या गतेतिहासाचे दस्तऐवजीकरण विलक्षण दक्षतेने आणि तारतम्याने केले जाणे आवश्यक ठरते. त्यासाठी मुळात आपल्या पूर्वकालीन संस्कृतीमध्ये नेमके काय काय साकारले याची साक्षेपी शोध घेण्याची एक दिशा या चरित्रकहाणी ग्रंथसंचाद्वारे मिळाली असून, हे सातही ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून सतत मार्गदर्शक ठरतील.
डॉ. सदानंद मोरे यांनी पूर्वेतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या अध्ययनविश्वातील प्रचलित संशोधन प्रणाली पाश्चात्य विद्यापरंपरेच्या मूशीमधून साकारली असल्याचे सांगितले. मात्र भारतासारख्या विशाल, बहुढंगी आणि प्राचीन संस्कृतीचे पाथेय लाभलेल्या देशाच्या गतकालाचे अध्ययन करण्यासाठी पाश्चात्य चौकट पुरेशी ठरत नाही. भारतीय संस्कृती व परंपरेचे देशी जाणीवांच्या माध्यमातून आकलन करू न घेण्याचा एक पर्याय या सात चरित्रग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले. श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेचे दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.