लोकमत न्यूज नेटवर्क
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान, तसेच जिल्ह्यामध्ये शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त मिठाईची पूजा करण्यात आली. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले. मात्र, कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाशिवरात्र यात्रा रद्द करण्यात आली. यामुळे यंदा महाशिवरात्री भाविकांविना साजरी करण्यात आली.
पहाटे पाच वाजता भुलेश्वर शिवलिंगावरती दही, दूध व पंचामृताने आंघोळ घालण्यात आली. यानंतर महाआरती करण्यात आली. सकाळी सहा वाजता माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके यांनी माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने पुजा केली. यावेळी पुरंदर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी अमर माने उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर बंद करण्यात आले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाशिवरात्री दिवशी संचारबंदी लागू केली होती. यामुळे जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला होता. अनेक भाविक मंदिराच्या सभोवताली जमा झाले. मात्र, त्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. अनुराज शुगर कारखाना व बालाजी देवस्थान यांच्या वतीने आकर्षक सजावट करण्यात आली.
चौकट
जेजुरी रेल्वे लाईनजवळ वीज वाहून जाणारी केबल खराब झाल्याने श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे येणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे महाशिवरात्रीदिवशी पुरेशी वीज मिळाली नाही. यामुळे येथील पुजारी व ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळच्या पूजेने भुलेश्वरची महाशिवरात्री यात्रेची सांगता करण्यात आली.
फोटो ओळ - महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे मिठाईची पूजा करण्यात आली.