पुणे - ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना साध्या खाटेसह आॅक्सिजन किंवा व्हेंटिलेटर खाट (बेड) मिळवताना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर नक्की काय करायचे, कुठे जायचे काही कळत नाही.कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाल्यावर एखाद्या रुग्णाची तब्येत अचानक बिघडल्यास कोविड केअर सेंटर मधून रुग्णाला तातडीने पुण्याला अथवा आॅक्सिजन, व्हेंटिलेटर खाट असलेल्या ठिकाणी रुग्णाला घेऊन जाण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला जातो. पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये खाट उपलब्ध आहे, याची नेमकी माहिती अजूनही मिळत नाही. जिल्हा नियंत्रण कक्षालाफोन केला तर त्यांच्याकडून महापालिका नियंत्रण कक्षाचा नंबर दिला जातो. महापालिका नियंत्रण कक्षात फोन केला तर जिल्हा परिषदेकडे पाठवले जाते. परस्पर रुग्णालयांशी संपर्क साधला तर सगळ््या खाटा ‘फुल’ असल्याचे सांगितले जाते. यामुळे गंभीर रुग्णांनाही वेळेत खाट मिळवण्यासाठी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे.गेल्या काही दिवसांत शहर आणि ग्रामीण भागात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाची तब्येत खालावल्यास नातेवाईकांना सांगितले जाते की, तुमच्या रुग्णांची परिस्थितीत गंभीर आहे तातडीने आॅक्सिजन, व्हेंटिलेटर खाट असलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला हलवा. असा निरोप आल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांची ससेहोलपट चालू होते. ग्रामीण भागातील रुग्णांना पुणे, पिंपरी-चिंचवड मध्ये आॅक्सिजन, व्हेंटिलेटर खाट उपलब्ध व्हावी यासाठी खास ‘बेड मॅनेजमेंट कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. परंतु या कक्षाकडे कोणतीही माहिती अचूक मिळत नाही.लाखोंच्या बिलामुळे खासगी रुग्णालयांचा धसकाखासगी रुग्णालयांमधल्या बिलाच्या संभाव्य आकड्याची भीती सामान्य रुग्णांना आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयांना सर्वसामान्य कोरोना रुग्णांचे प्राधान्य असते.परिणामी या रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. जम्बो हॉस्पिटलमध्ये आठशे रुग्णांची सोय होणार असल्याच्या घोषणेमुळे दिलासा निर्माण झाला होता.प्रत्यक्षात जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड झाल्यामुळे उपचार घ्यावेत कोठे असा प्रश्न सामान्य पुणेकरांपुढे उपस्थित झाला आहे.
कोरोना रुग्णाला मन:स्ताप न होऊ देता कोणी बेड द्याल का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 7:02 AM