लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : घराघरांत आज विविध कारणांनी तणाव वाढत आहे. अशा वेळी घरातील व्यक्तींवरील राग हा पाण्यावरील रेघेसारखा असावा. क्षणिक असावा. तरच घरात शांतता नांदेल आणि तुम्ही आनंदाने जगू शकाल, असे प्रतिपादन प्रा. श्याम भुर्के यांनी चिंचवड येथे केले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासद वाढदिवस सत्काराच्या वेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशिष सोळंकी उपस्थित होते. सहकार्यवाह चंद्रकांत कोष्टी, रमेश डोंगरे, उषा गर्गे, तुकाराम सपकाळ, सूर्यकांत पारखी, अरुण घोलप, नारायण दिवेकर, सुदाम गुरव आदी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष कृष्णाजी जगताप यांनी स्वागत केले. या वेळी २३ सभासदांचे सत्कार केले. ते पुढे म्हणाले, ‘‘जिथे तणाव जास्त तिथे विनोद जास्त. घरामध्ये विनोद गुणासारखा वाढला पाहिजे, तरच घरात आनंद निर्माण होईल. विनोदामुळे हास्य निर्माण होते व त्यामुळे प्रकृती चांगली राहते. घरातील लहान-मोठ्या व्यक्तीबरोबर संवाद साधत राहा. आपले घर सुखी, तर जग सुखी. आपल्या घरात प्रथम अच्छे दिन येऊ द्या. पत्नी, सून, मुले यांचे कौतुक करा. काही चुकल्यास क्षमा मागा, पण आनंदाने जगा. राग दगडावरच्या किंवा वाळूवरील रेघेसारखा नसावा, तर तो पाण्यावरच्या रेषेसारखा क्षणिक असावा.’’
राग हा पाण्यावरील रेघेसारखा असावा
By admin | Published: May 23, 2017 5:01 AM