सोमेश्वरनगर : वाघळवाडी (ता. बारामती) येथील काल आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चार घरांना परिसरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विविध प्रकारच्या मदतीतून आज माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळाले.
वाघळवाडी (ता. बारामती) येथील आगीत शेळी आणि कोंबड्या मरण पावल्या, तर घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही, कपाट, घरातील विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य आदी चार कुटुंबांचे मिळून अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.कल्पना शहाजी खांडेकर, प्रमिला दऱ्याप्पा गोडसे, जमुनाबाई परशुराम घाडगे आणि शालन अशोक कोकरे अशी झोपड्या जळालेल्या कुटुंबीयांची नावे आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करीत मदत केली होती.आज सकाळी सोमेश्वरनगर येथील अक्षय शिंदे फाउंडेशनच्यावतीने या चारही कुटुंबांना फाउंडेशनचे अध्यक्ष आर. एन. शिंदे, तसेच सचिव संजय शिंदे यांच्यावतीने प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सदस्य संतोषशेंडकर, महेश जगताप, योगेश यादव, राजेंद्र बालगुडे, बाबूलाल पडवळ, तसेच शहाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी या पैशांचा वापर घरे उभारणीसाठीच करावा, असे आवाहन आर. एन. शिंदे यांनी केले. त्याचबरोबर मुलांच्या शालेय साहित्याची भारत ज्ञान विज्ञान संघटनेने कालच तातडीने सोय केली, तसेच कोणी जुनी कपडे, कोणी ब्लँकेट, कोणी धान्य, तर कोणी वस्तूच्या स्वरुपात मदत केली.गॅस कंपनी देणार मदत४काल सिलिंडरचा स्फोट होऊन वाघळवाडी येथील चार घरे भस्मसात झाली होती. या सर्व कुटुंबांना गॅस कंपनीच्यावतीने मदत दिली जाणार असल्याची माहिती लोणंद येथील कुमार गॅस एजन्सीचे कार्यकारी संचालक अमित तापडिया यांनी दिली.