दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढत असताना व्यापारी व नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे प्रशासन हतबल होत आहे. काल (दि. ६) यवत ग्रामीण रुग्णालयात २१५ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. यातील तब्बल ८१ जण कोरोनाबाधित निघाले, तर १३१ जण् निगेटिव्ह आहेत. म्हणजेच सरासरी ४० % पॉझिटिव्ह आले आहेत.
दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्यामुळे आरोग्यव्यस्थेवर ताण येत आहे. तर कोरोनाची साथ वाढू नये म्हणून नागरिक काळजी घेण्याऐवजी हलगर्जीपणा करत असल्याने प्रशासन हतबल होत आहे. दौंड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या अनेक गावांमध्ये सुमारे १०० पेक्षा अधिक कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, तर दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
यवत, केडगाव, पाटस व राहू या गावांमध्ये अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या आसपास आहे. तर यवतमध्ये
अॅक्टिव्ह रुग्ण १५० च्या अासपास आहेत. मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावांमध्ये काही दुकाने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालू ठेवत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. काही व्यापाऱ्यांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आले तर इतर सदस्य त्यांची दुकाने उघडी ठेवत असल्याने ते ‘सुपर स्प्रेडर’ ठरत आहेत. प्रशासनाच्या कारवाईची भीतीदेखील व्यापारी बाळगत नसल्याने ते त्यांच्याबरोबरच ग्राहकांच्या जिवाची पर्वा करत नाहीत.
शासकीय अहवालानुसार दि. ३ एप्रिलपर्यंत दौंड तालुक्यात ७ हजार २३८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १ हजार ४४० अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात एकूण ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शासकीय नोंद सदर अहवालात आहे. मात्र, कोरोनाबाधित व मृत्यू झालेल्यांची संख्या शासकीय अहवालापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.
यवतमधील दोन दुकाने सील
यवत गावात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असताना काही व्यापारी व नागरिक हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असून त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई सुरू केल्याची माहिती सरपंच समीर दोरगे यांनी दिली. यवत धील दोन दुकाने सील करण्यात आली असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व गावात गरज नसताना फिरणाऱ्यांवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
यवत येथील मुख्य बाजारपेठेत परवानगी नसतानादेखील दुकान उघडे ठेवल्यामुळे दुकान सील करण्यात आले.