पुणे : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधिक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे. यांच्यासह ३२ खेळाडूंची थेट शासकीय सेवेत निवड झाली असून, त्यात ९ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे.
खेळाच्या माध्यमातून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्ती मिळावी यासाठी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची ३ आॅगस्ट २०१८रोजी बैठक झाली. त्यात ३२ खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिपाई, लिपिक, क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा अधिकारी, नायब तहसिलदार, पोलीस उपअधिक्षक आणि उपजिल्हाधिकारी अशा पदांवर खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या पदस्थापनेचे आदेश संबंधित विभागाने काढावेत असा राज्यसरकारने दिला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू आवारे याने २०११मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक संपादन केले होते. तर, २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले पाहीजे. ललिता बाबरने २०१५ साली वुहान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ सालच्या स्पर्धेत रौप्य पदक संपादन केले होते.पोलीस उपअधिक्षकपदी निवड झाल्यानंतर लोकमतशी बोलताना आवारे म्हणाला, लहानपणापासून पोलीस बनण्याचे स्वप्न होते. ते या निमित्ताने पूर्ण झाले. मात्र या पुढेही कुस्तीचा सराव सुरुच ठेवणार असून, देशासाठी आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे.
लहानपणी वडिलांकडे धरला होता ‘वर्दी’चा हट्ट
कारगील युद्धामुळे देशसेवा आणि वर्दीचे आकर्षण वाढले. मी साधरण तिसरी चौथीत असतानाची गोष्ट आहे. माझे परिचित पोलिस खात्यात होते. त्यामुळे वडिलांकडे तशीच पोलीस वर्दी हवी असा हट्ट धरला होता. त्यावेळी घरची परिस्थिती हट्ट पुरविण्याची नव्हती. तरी देखील वडीलांनी तसा पोषाख आणून दिला. आज खेळाच्या माध्यमातून मला खरीखुरी वर्दी मिळाली आहे. ज्या प्रमाणे मी खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकीक केला. त्याप्रमाणे पोलीसांची वर्दी घालून समाजाची सेवा करेन. तूर्तास देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे. त्याच्या तयारीत खंड पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल आवारे याने लाेकमतकडे दिली.