पुणे : राष्ट्रीय तालीम संघ पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने तिसऱ्या २३ वर्षांखालील फ्रीस्टाईल वा ग्रीकोरोमन मुले व मुली यांच्यासाठी राज्य कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे. येत्या शनिवारी (दि. २८) छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे सकाळी ९ ते ११ या वेळेत वजने घेतली जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता स्पर्धा चालू होईल, असे राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी सांगितले.
मुलांच्या फ्री स्टाईल प्रकारात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ आणि सव्वाशे किलो, तर मुलांच्या ग्रिकोरोमन प्रकारात ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो वजनी गट असणार आहेत. मुलींच्या लढती ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५, ६८, ७२, ७६ किलो वजनी गटाच्या राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडू पुणे शहराचा रहिवासी असणे आवश्यक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूचा जन्म १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००२ या कालावधीतला असला पाहिजे. खेळाडूंनी सहभागी होताना दहावी व बारावीचे मूळ बोर्ड सर्टिफिकेट, आधार कार्ड व जन्मदाखला आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी गणेश दांगट, अविनाश टकले व योगेश पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बुचडे यांनी केले आहे.