टीम लोकमत :लक्ष्मण मोरे, हिना कौसर खान-पिंजार, नम्रता फडणीस -
साधारणपणे १४ ते १८ या वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. विशेषत: १६ ते १८ वयोगटातील मुलांचा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमधला सहभाग चिंताजनक आहे. पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आई-वडील दिवसभर काम करतात. आपली मुले काय करतात, कुठे जातात याचा पत्ताच पालकांना नसतो. मुलांच्या शाळांच्या दप्तरांमध्ये चाकू आणि कोयत्यासारखी हत्यारे असतात, याचीही माहिती त्यांना नसते. आजूबाजूला वाढत चाललेली गुन्हेगारी, गुन्हेगारांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, अंगठ्या आणि एखादे राजकीय पद पदरात पाडून घेतल्यावर शहरभर झळकणारी ‘भाऊ’, ‘दादा’ यांची बॅनर्स याचे मोठे आकर्षण या वयोगटातील मुलांना आहे. गणेशोत्सव असो किंवा नवरात्रोत्सव स्पिकरच्या भिंती उभारुन त्यासमोर बीभत्स नाच करणाऱ्यांमध्येही याच वयातील मुलांचा सर्वाधिक सहभाग असतो. पैसा आणि दहशतीचे आकर्षण ही या मुलांसमोरची आव्हाने आहेत. कमी वयात मिळणारा पैसा आणि त्यातून करता येणारी मौजमजा त्यांच्यामधील गुन्हेगारी वृत्तीला खतपाणी घालत आहे. गुन्हेगारी टोळ्यांना अल्पवयीन मुलांचे कायदे आणि त्याचे फायदे चांगलेच माहिती आहेत. किंबहुना गुन्हेगारांचे कायदेशीर सल्लागार त्याची माहिती मोठमोठ्या गुन्हेगारांना आणि टोळीप्रमुखांना करून देतात. त्यामुळे कायद्याचा फायदा मिळविण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या या मुलांमधील गुन्हेगारीचे असलेले आकर्षण ओळखून त्यांना पद्धतशीरपणे वापरुन घेत आहेत. खुनाच्या वाढत्या घटनांमध्ये अल्पवयीन मारेकऱ्यांचा सहभागही मोठा आहे. अगदी दोन ते पाच हजारांमध्येही मुले एखाद्याचा जीव घ्यायला मागे पुढे बघेनाशी झाली आहेत.महागडे कपडे आणि वेगवान दुचाकींची ‘क्रेझ’ त्यांच्यामध्ये आहेच. त्यामुळेच रात्री- बेरात्री दुचाकीचालकांना अडवून त्यांना लुटण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमधील अल्पवयीन आरोपींचे प्रमाण लक्षणीय आहे. लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही अल्पवयीन आरोपींचेच प्रमाण जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. अल्पवयीन गुन्हेगारांमध्ये सुधारणा होण्यासाठी सुधारगृहे चालवली जातात. त्यांचा दर्जा आणि तेथील वागणूक यामुळे या मुलांवर नेमका उलटा परिणाम होतो. मुले सुधारण्याऐवजी बिघडत जातात. त्यांच्यातील गुन्हेगारीवृत्ती बळावत जाते, ही वस्तुस्थिती आहे. तिथे गेल्यावर राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या अन्य आरोपींसोबत त्यांची ओळख होते. त्यातून त्यांची टोळी तयार होते. पुढे हीच मुले सुधारण्याऐवजी चोऱ्या, घरफोड्या, दरोड्यांसारखे गुन्हे करण्यात सराईत होतात. केंद्रीय मंत्रिमंडळाने बाल गुन्हेगारांचे वय १६ पर्यंत कमी केल्यामुळे त्याचा पोलीस यंत्रणेला आणि न्यायसंस्थेला फायदा होणार आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्यास त्यापासून इतर धडा घेतील. कायद्याचा धाकच त्यांना रोखू शकतो.गुन्हेगारीकडे वळणारी ही पावले रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि समाजासमोर आहे. केवळ दंडुकेशाहीने हा प्रश्न सुटणारा नाही. गुन्हेगारी टोळ्या बंद पाडायच्या असतील, तर या टोळ्यांमध्ये होणारी भरती थांबवावी लागेल. जे सध्यातरी शक्य नाही. अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनाच मुलांसोबतचा संवाद वाढवावा लागणार आहे. त्यासोबतच शालेय स्तरावरही मुलांना त्याचे धोके समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. दाऊद इब्राहिम, छोटा राजनपासून ते लहानसहान गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्हेगारीची सुरुवात बालवयातच केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये आणि समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.