पुणे : आपल्यासारखाच एक जीव निर्माण करण्याची निसर्गदत्त देणगी असलेली 'मासिक पाळी' कधीकधी नकोशी वाटते. प्रसंगी अडचणींवर मात केली तरी अडथळ्यांच्या शर्यतीत 'पाळी' मात्र कायम लक्षात राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला नकोशी वाटू लागते. असा एकतरी अनुभव प्रत्येकीला कधी ना कधी आलेला असतो. मात्र, 'लोक काय म्हणतील' या भीतीने आपण त्याबद्दल कधीच बोलत नाही. मात्र, हे अनुभव शब्दबद्ध व्हावेत यासाठी 'समाजबंध' संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यांचे ई-बुक प्रसिद्ध केले जाणार आहे.मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही. परंपरागत चालत आलेल्या अनेक गैरसमजांमुळे मुलगी वयात येण्याच्या आधीपासूनच तिच्या मनात मासिक पाळीची भीती बसते. मुलींना, महिलांना या काळात शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.समाजबंध संस्थेच्या माध्यमातून सचिन आशा सुभाष यांनी 'प पाळीचा' या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याचा वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मासिक पाळी या विषयावर अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुभवांवर आधारित एक अहवालही तयार केला जाणार असून, परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणार आहेत.सचिन आशा सुभाष यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'कधी सोबत पॅड नसताना पाळी येते, कधी अनपेक्षितपणे प्रवासात पाळी येते, ऐन परीक्षांमध्ये, ऑफिसमध्ये असताना तर कधी घरी काही 'कार्य' असताना पाळी येते. आणि मग सुरू होते महिलांच्या जीवाची घालमेल, 'अच्छे दाग' लपवण्याची धडपड, आराम मिळवण्याची, बाथरूम शोधण्याची धावपळ आणि पॅड मिळवण्यासाठी आणि बदलण्यासाठीची कसरत. कधी जवळ पॅडच नसते, कधी पॅड बदलायला जागा नसते, कधी नाईलाजाने अतिगलिच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो तर कधी घरातील कार्यात 'विघ्न' नको म्हणून आपल्यालाच दूर केलं जातं किंवा पाळीच दूर लोटली जाते. असे अनेक अनुभव अनेकांच्या गाठीशी असतात. याच अनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'अनुभव लिहिण्यासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार कोणत्याही भाषेत लिहिता येणार आहे. आपला अनुभव टाईप करून samajbandhindia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा 7709488286 यावर व्हॉटसअपद्वारे ३१ मे पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सखींनो, 'त्या' पाच दिवसांबद्दल बिनधास्त लिहा! 'समाजबंध' चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 6:04 PM
मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही...
ठळक मुद्देमासिक पाळीच्या अनुभव लेखन स्पर्धेतून साकारणार ई-बुकपरिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणारअनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती