पुणे : कविता महाजन या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.कविता महाजन यांनी आपल्या लेखनीतून आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत आणि स्वयंसेवी संस्थांमधल्या स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील त्यांनी ‘ब्र’ मध्ये टिपले होते. ‘ब्र’ नंतर ‘भिन्न’ कादंबरीतून सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतूनच जगासमोर आणली. टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांची सद्यस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौराही त्यांनी केला होता.कविताच्या अकाली जाण्याचे धक्का बसला आहे. चांगले विचार, चांगले लेखन, स्त्रीची बाजू ठामपणे मांडण्याची भूमिका यामुळे तिने कायम वेगळेपण जपले. तिच्या जाण्याने झालेले दु:ख शब्दांच्या पलीकडले आहे. एका जातिवंत लेखिकेला आपण मुकलो आहोत, याचे अतीव दु:ख होत आहे.- डॉ. माधवी वैद्यसृजनशील चित्रकार, कवयित्री, लेखिका कविता महाजन गेल्या. भावपूर्ण श्रद्धांजली.- रामदास फुटाणेकविता महाजन यांनी काव्य, कादंबरी, स्तंभ अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये मुशाफिरी केली. त्यांनी बालवाङ्मयातही उत्तम काम केले. ती चांगली चित्रकार होती. तिने मराठी साहित्यविश्वात वेगवेगळे प्रयोग केले. तिचे लिखाण अत्यंत उत्स्फूर्त आणि नैसर्गिक धाटणीचे होते. तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका गमावल्याने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. - सुजाता देशमुखकविता महाजन आजारी असून अॅडमिट असल्याचे दुपारी समजले होते. उद्या तिला भेटायला जाण्याचेही ठरवले होते. अशातच अचानक त्यांच्या निधनाची बातमी आल्याने धक्का बसला. त्या मूळच्या नांदेडच्या. त्यांच्या वडिलांशी माझा चांगला स्नेह होता. मराठवाड्यातील प्रथितयश लेखिका अशी त्यांची कीर्ती होती. त्यांची संपादनाची, अनुवादाची हातोटी वाखाणण्याजोगी होती. इतक्या कमी वयात त्यांचे जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. सोशल मीडियावर सक्रिय सहभाग असलेली ती सध्याची एकमेव लेखिका होती. भविष्यात तिच्याकडून अजून चांगले लिखाण वाचायला मिळाले असते. - लक्ष्मीकांत देशमुखकविता महाजन यांचे लेखन मी खूप आवडीने वाचायचे. थेट, स्पष्ट, वास्तवाला भिडणारे, भेदक असे त्यांचे लेखन होते. स्त्रीवादी आणि पुरोगामी विचारांच्या त्या लेखिका होत्या. विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याचे कसब त्यांच्या लेखनात होते. ‘भिन्न’ ही कादंबरी वाचल्यावर मी दोन-तीन महिने त्यातून बाहेर पडू शकले नव्हते. चित्रकार, सामाजिक कार्यकर्ती, प्रत्यक्ष समाजात उतरून लिखाण करणारी लेखिका अशी त्यांची ओळख होती. - आश्लेषा महाजनकविता महाजन या मराठीतील अत्यंत महत्त्वाच्या लेखिका होत्या. समाजकारण, राजकारण यावर क्षकिरण टाकण्याचा प्रयत्न त्यांनी लिखाणातून केला. ‘ब्र’ ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरली. स्त्रीवादाच्या पलीकडे जाऊन माणुसकीला आवाहन करणारे त्यांचे लिखाण होते. प्रयोगशील, समाजाला चिंतन करायला लावणाºया लेखिकेला आपण मुकलो आहोत. - प्रा. मिलिंद जोशीकविताकडे बहुपेढी प्रतिभा होती. संशोधन, लेखन, चित्रकला असे वैविध्य तिने जपले. वेगळ्या ढंगाचे लिखाण ही तिची ठळक ओळख होती. ‘ब्र’मधून त्यांनी सामाजिक जाणिवा, कलात्मकता यांचा मेळ साधला. ही कादंबरी साहित्यातील मानदंड ठरली. अनेक महत्त्वाचे अनुवाद तिने मराठी साहित्याला बहाल केले. ‘भारतीय लेखिका’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता. ब्लॉगलेखनातून परीघाबाहेरील स्त्रियांच्या भावविश्वाचा ठाव घेण्याचा तिने प्रयत्न केला. - नीलिमा गुंडी
तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी लेखिका , कविता महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 2:01 AM