लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : परीक्षेत उत्तीर्ण होण्यापुरते इंग्रजीचे पाठांतर करणे, ही आतापर्यंतच्या इंग्रजी विषयाच्या अध्ययनाची पद्धत आता हद्दपार होऊ लागली आहे. इंग्रजीची भीती जाऊन गोडी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचा इंग्रजीचे अध्यापन व अध्ययनात अधिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाचन, लेखन, भाषण आणि संभाषणामध्ये विद्यार्थी पारंगत होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करणारा पाठ्यक्रम तयार केला जात आहे. त्यामुळे इतर भाषांप्रमाणेच इंग्रजीही आता सुलभ होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.इंग्रजी ही रोजगार, तसेच व्यवहाराची भाषा झाली आहे. त्यामुळे मातृभाषेबरोबरच जगामध्ये इंग्रजी भाषेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे इंग्रजी चांगले लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक बनले आहे. आतापर्यंत इंग्रजी ही भाषा म्हणून न शिकविता ती विषय म्हणून शिकविली जात होती. त्यामुळे वाचन, लेखन, संभाषण या कौशल्यांचा विकास होताना दिसत नव्हता. परिणामी, दररोजच्या व्यवहारात इंग्रजीचा वापर करणे अनेक विद्यार्थ्यांना कठीण जाते. त्यामुळे इंग्रजीमध्ये अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. म्हणून इंग्रजीच्या अध्ययनाची प्रक्रिया रंजक, आनंदी आणि सहज होईल, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रमामध्ये नवनवीन बदल केले जात आहे. विद्यार्थ्यांना इतर भाषांप्रमाणेच इंग्रजीची गोडी लागावी, इंग्रजीविषयीची भीती दूर व्हावी, यासाठी बदल करण्यात आले आहेत.बालभारतीच्या इंग्रजी भाषा समितीतील सदस्या डॉ. मुक्तजा मठकरी म्हणाल्या, ‘‘नवीन अभ्यासक्रमामध्ये कृतीवर आधारित अध्यापनावर भर देण्यात आला आहे. पूर्वी पाठांतरावर अधिक भर असायचाय. कृती किंवा सादरीकरण नसल्याने विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगल्याप्रकारे उमजत नव्हते. हे अपयश दूर करण्याचा मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. इंग्रजी भाषा शिकताना सभोवतालच्या प्रत्येक घटकासोबत ती जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक विषयांमध्ये इंग्रजीचा वापर कसा करता येईल, त्याबाबतची कौशल्ये कशी विकसित होतील, याचा विचार करण्यात आला आहे. पाठांतर न करता कृतीतून इंग्रजी शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कला वाढविण्याचा प्रयत्न आहे. व्याकरणही टप्प्या-टप्प्याने देण्यात आले आहे. शब्दसंग्रह विकसित करण्यासाठी चर्चा आणि सादरीकरण करावे, यादृष्टीने विद्यार्थ्यांना कृती देण्यात आली आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असून, त्यांना प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. करिअरच्या दृष्टीनेही विविध माहिती देण्यात आली आहे.
इंग्रजीला लेखन, संभाषण कौशल्याचा ‘टच’
By admin | Published: May 11, 2017 4:52 AM