पुणे : . लेखन ही एक तपश्चर्याच असते, जी सोपी नसते. अनेक वेळा स्त्रियांमध्ये लेखन, वक्तृत्व, समाजकार्य असे अनेक गुण असूनही, स्त्रियांना त्यांचा विकास करण्याची संधी अथवा सवड मिळत नाही, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या ' जपून ठेवू सृष्टी' या कुमार कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी छात्र प्रबोधनचे मुख्य संपादक महेंद्र सेठिया, स्वाती ताडफळे, मृणालिनी कानिटकर जोशी आणि लेखिका अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या.
डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानासह अनेक हक्क मिळवून दिले, असे सांगून डॉ. गोऱ्हे यांनी स्त्रियांमध्ये अनेक उल्लेखनीय गुण असतात. पण त्यांना संधी मिळत नाही. परंतु अंजली कुलकर्णी यांनी मात्र ३० वर्षे लेखन करून तपश्चर्या सुरू ठेवली असल्याचे नमूद केले.
महेंद्र सेठिया म्हणाले, अंजली कुलकर्णी मुलांच्या भावविश्वात खोल उतरून आत्मीयतेने लिहितात. छात्र प्रबोधनच्या अभिवाचन, कवितालेखन, संपादन अशा विविध कार्यशाळांमध्ये त्यांनी चांगले काम केले.
या प्रसंगी स्वाती ताडफळे, मृणालिनी कानिटकर जोशी यांनीही विचार मांडले.
प्रदीप खेतमर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गोल्डन पेज पब्लिकेशनच्या संचालक अमृता खेतमर यांनी आभार मानले.
-------------------------------