पुणे : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या (एसएनडीटी) दूरशिक्षणच्या विद्यार्थिनींना नियमित विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. बुधवारी इंग्रजी विषयाचा पेपरही अशाच पद्धतीने चुकीचा देण्यात आला होता. शुक्रवारी मराठी पेपरबाबत हा प्रकार घडल्याने विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागला.विद्यापीठाची सध्या दूरशिक्षण आणि सर्वसाधारण अभ्यासक्रमांची सत्र परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते २ यावेळेत मराठीचा पेपर होता. काही विद्यार्थिनींना जुन्या अभ्यासक्रमानुसार तर काहींना नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले. याबाबत सात विद्यार्थिनींनी आक्षेप घेतला. मात्र, परीक्षकांनी त्यांना हीच प्रश्नपत्रिका सोडविण्यास सांगण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थीनी केवळ २० गुणांचाच पेपर सोडवू शकल्या. त्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने हा प्रकार घडला. दूरशिक्षणच्या सर्व विद्यार्थिनींना नव्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका मिळणे अपेक्षित होते. या प्रकाराबाबत प्राचार्यांकडे तक्रार करण्यात आल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘एसएनडीटी’त पुन्हा चुकीचा पेपर
By admin | Published: March 25, 2017 4:17 AM