पुणे : ‘पर्यावरण विरुद्ध विकास असे चित्र निर्माण होणे चुकीचे आहे. सांस्कृतिक, पुरातत्त्व संवर्धनाप्रमाणे पर्यावरणसंवर्धनाची सुरुवात शाळा आणि महाविद्यालयापासून व्हायला हवी. निसर्गसंवर्धनावर आपला सामाजिक-आर्थिक विकास, अन्नसुरक्षा अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. यात प्रशासन आणि राजकीय घटकांची महत्त्वाची भूमिका आहे. राजकारणी लोकांचे फक्त पुढच्या निवडणुकीकडे लक्ष असते, हे बदलायला हवे,’ अशा शब्दांत ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक एम. के. रणजितसिंह यांनी मार्मिक टिपण्णी केली.किर्लाेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताचे संवर्धन प्रणालीचे उत्कृष्ट नेतृत्व एम. के. रणजितसिंह यांना वसुंधरा सन्मान, पर्यावरण पत्रकार आरती कुलकर्णी यांना इको जनार्लिस्ट, बी. एन. एस. एस. इंडियाचे अध्यक्ष डॉ. दीपक आपटे यांना ग्रीन टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आले.दीपक आपटे म्हणाले, ‘‘वातावरणबदलाचा घातक परिणाम जंगलाप्रमाणे समुद्राखालील जीवसृष्टीवरही होत आहे. मात्र, तेथील पर्यावरणऱ्हासाकडे दुर्लक्ष होत आहे.‘‘जमिनीच्या तुलनेत समुद्राखाली वावरणे हे खूपच कठीण आहे, हे त्यातले एक महत्वाचे कारण. पण, पर्यावरणऱ्हासाचे उत्तर सागरातच आहे, हे विसरून चालणार नाही. पर्यावरणसंवर्धनाचा संबंध विज्ञानाशी नसून, राजकीय इच्छाशक्तीशी आहे.’’या वेळी आरती किर्लोस्कर, आर. आर. देशपांडे, माधव चंद्रचूड आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात वन्यजीव व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. वन्यजीवनाबद्दल सखोल अभ्यास होताना दिसत नाही. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्ये पाहण्यासाठी जाताना व्याघ्रदर्शन घडले पाहिजे, असा पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटन व्यवसाय करणारे लोकही वाघ दिसेल, अशी जाहिरात करतात. रस्त्यांच्या कडेला बोअरवेल घेऊन तेथील टाक्या पाण्याने भरल्या जातात. जंगलात मात्र जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था नसते. अशा वेळी प्राण्यांना तिथे येण्याशिवाय पर्याय राहत नाही. हा प्रकार थांबायला हवा.- मारुती चितमपल्ली