काळुस : मागील काही दिवसांपासून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीबरोबरच चोरांच्या टोळ्या आल्याबाबतच्या सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. याबाबत दोषी आढळलेल्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना व चोरांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी फिरत असल्याबाबतच्या पोस्ट व्हॉट्सअपवरून पसरवल्या जात आहेत. या प्रकारामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य नागरिक प्रचंड दहशतीखाली आहे. संबंधितांकडून चोरांच्या टोळ्या आल्याबाबतच्या आॅडिओ क्लिप, तसेच पोस्ट पसरवल्या जात आहेत. यामुळे विशेषत: मुले व महिला भीतीच्या सावटाखाली आहेत. अशा पोस्ट व्हॉट्सअपवर काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.प्रत्यक्षात अशा प्रकारच्या बातम्यांमध्ये तथ्य नसून तशा स्वरूपाच्या लेखी तक्रारी पोलिसांकडे अजूनतरी आलेल्या नाहीत. बऱ्याच वेळा मनोरंजनाचा भाग म्हणूनच काही जणांकडून अशा प्रकारचे रिकामटेकडे उद्योग सुरु असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबत सामान्य नागरिकांनीही सामाजिक भान ठेवून कोणतीही खात्री असल्याशिवाय अशा पोस्ट पुढे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. यापुढे दोषी आढळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे
चुकीच्या पोस्ट; कारवाई होणार
By admin | Published: March 16, 2017 2:00 AM