लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे येथील निसर्ग बहरला आहे. धबधबबे, नद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक पर्यटनस्थळावर जाण्यास बंदी असतानाही गर्दी करत आहेत. मात्र, सेल्फीच्या मोहात अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.
जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यांत अनेक गडकिल्ले, धबधबे आणि पर्यटन स्थळे आहेत. दरवर्षी या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देत असतात. आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर खोऱ्यात कोंढवळ धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. आहुपे खाेऱ्यातही निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. जुन्नर तालुक्यात नाने घाट, दऱ्या घाट, माणिकडोह धरण, चांवड किल्ला, नारायणगड या ठिकाणी भेटी देत असतात. निसर्ग साैंदर्याने युक्त असलेली ही स्थळे तेवढीच धोकादायकसुद्धा आहेत. येथील निसर्ग साैंदर्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. डोंगर कड्यावर जात जिवाची पर्वा न करता धोकायदायकरीत्या पर्यटक सेल्फी काढत असतात. अशाच सेल्फीच्या नादात कोंढवळ धबधब्यात सेल्फी काढताना एका तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू झाला. आजपर्यंत या तरुणाचा मृतदेह सापडू शकला नाही.
जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांवर धोकादायक प्रवणस्थळ म्हणून फलक लागलेले नाहीत. यामुळे पर्यटक बिनदिक्कतपणे या ठिकाणी फिरत असतात. त्यातून अनेक अपघात घडत असतात. वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावरून एक नऊ वर्षांचा मुलगा दरीत कोसळला होता. सुदैवाने त्याचा जीव वाचला; पण प्रत्येकाच्या बाबतीत हे होईलच असे नाही. यामुळे संबंधित विभागाने अशा स्थळांची यादी बनवून ती धोकादायक जाहीर करणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी माहिती देणारे फलक लावणेही गरजेचे आहे. पर्यटकांनीही आपल्या जिवाची काळजी घेत या ठिकाणी वावरणे गरजेचे आहे.
चौकट
पर्यटनाला जा, पण काळजी घ्या !
लक्ष्मी धबधबा (वेल्हा तालुका मढे घाट)
वेल्हे तालुक्यातील लक्ष्मी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक जात असतात. पुण्यापासून जवळच हा धबधबा आहे. पुणे-सातारा महामार्गावरून चेलाडी फाटा येथून पर्यटक वेल्हा येथे जातात. वेल्हा येथून गुंजवणी धरणाच्या शेजारी असलेल्या मार्गाद्वारे केळद येथे पर्यटक जातात. येथून काही अंतरावर हा धबधबा आहे. येथे खोल दरी आहे. पावसाळ्यात येथे धुके असल्याने समोरचा अंदाज येत नाही. त्यामुळे दरीत कोसळण्याची शक्यता असते. यामुळे पर्यटकांनी येथे जाताना काळजी घ्यावी.
-----
देवकुंड धबधबा
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा आहे. पुण्यापासून हा धबधबा जवळ आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूसच्या हद्दीत भीरा गाव आहे. भिरा गावातून दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यावर या धबधब्याच्या ठिकाणी पोहोचता येते. पुण्यातून चांदणी चाैक मार्गे भिरा आहे. चांदणी चाैक -माले- पिरंगुट - पाैड- माले - मुळशी - चाचवली - वारक - निवे- सारोळ ताम्हिणी घाट उतरल्यावर विळे भागाड नावाचा एमआयडीसीचा परिसर येतो. येथून काही अंतरावर भिरा गाव आहे. देवकुंड ट्रेक हा अतिशय अवघड ट्रेक आहे. यामुळे येथे जाताना वाटाड्या सोबत असावा. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून जाण्याची भीती असते.
कोंढवळ येथील चौंडीचा धबधबा
हा धबधबा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतो. परंतु, हा धबधबा अत्यंत धोकादायक असल्यामुळे बाहेरून आलेल्या पर्यटकांना याचा अंदाज येत नाही. या धबधब्यावर जाण्यासाठी मंचर, घोडेगाव, डिंभा, तळेघर, निगडाळे यावरून कोंढवळ येथील चौंडीच्या धबधब्यावर जाता येते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरपासून अलीकडे दहा - बारा कि.मी. अंतरावर हा धबधबा असून, भीमाशंकर अभयारण्यामध्ये हा धबधबा आहे. भीमाशंकर वनविभागाकडून या धबधब्यावर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे अनेक दुर्घटना या ठिकाणी घडल्या आहेत.
चौकट
वन विभागाच्या वतीने या धबधब्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा फलक, सुरक्षा रक्षक ठेवण्यात आलेले नाहीत. यामुळे धोकादायक ठिकाणांचा अंदाज पर्यटकांना येत नाही. कोरोनामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या भागात पर्यटनास बंदी असतानाही पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत.
कोट
जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशान्वये आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर मंदिर परिसर, कोंढवळ धबधबा, डिंभे धरण, आहुपे पर्यटन स्थळ या ठिकाणी जमावबंदी व वर्षाविहारास बंदी घातली आहे. ( १४४ कलम लागू करण्यात आले आहे.) तरी काही लोक या परिसरात फिरताना दिसून येत आहेत. अशा लोकांवर पोलिसांकडून कडक कारवाई सुरू आहे. कुणीही या भागात दर्शनास व पर्यटनास येऊ नये, अन्यथा त्यावर कायदेशीर कारवाई करून वाहन जप्त केले जाईल.
- जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव पोलीस ठाणे